ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने भारताला आजच्या दिवसातले चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारतीय संघाने ३-१ ने मलेशियाला पराभूत करून या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
अंतिम फेरीत भारताची फुलराणी सायना नेहवालने सोनई चेह विरुद्ध २१-११,१९-२१,२१-९ असा विजय मिळवत भारताचे सुवर्णपदक निस्चित केले. भारताचे हे राष्ट्रकुल सपर्धा २०१८ मधील हे एकूण १० वे सुवर्णपदक आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आता १९ पदकांची संख्या झाली आहे.
यात १० सुवर्णपदके, ४ रौप्य पदके आणि ५ कांस्य पदकांची समावेश आहे. यामुळे भारत पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
असे मिळवले भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाने सुवर्णपदक:
सुवर्णपदकाचा या अंतिम फेरीत भारताचा सामना मलेशिया विरुद्ध झाला.
या अंतिम फेरीत पहिला सामना मिश्र दुहेरीचा झाला. यात भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रानकिरेड्डी या जोडीने पेंग सून चॅन आणि लिऊ यिंग गो या जोडीवर २१-१४,१५-२१,२१-१५ अशी मात केली.
त्यांनतर भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने एकेरी लढतीत चॉन्ग वेई लीला २१-१७,२१-१४ असे सरळ सेट मध्ये पराभूत केले. यामुळे भारताने सुवर्णपदकाचा शर्यतीत २-० अशी आघाडी मिळवली.
मात्र या आघाडीनंतर मलेशियाला व्ही शेम गो आणि वि किजोंग टॅन या जोडीने पुरुष दुहेरीत पुनरागमन करून दिले. त्यांनी भारताच्या सात्विक रानकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला १५-२१,२०-२२ असा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
यानंतर मात्र अखेर सायना नेहवालने महिला एकेरीत विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताने मलेशिया विरुद्ध ३-१ ने आघाडी घेत सुवर्णपदकालाही गवसणी घातली.