क्रिकेट जगतातील सर्वात जुना असलेला क्रिकेट प्रकार म्हणजेच कसोटी क्रिकेट होय. या क्रिकेट प्रकारात खेळणे म्हणजे एक प्रकारे गड चढण्याइतपत अवघड काम असते. फलंदाजांना यामध्ये तर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. काही फलंदाज असे असतात, जे आपल्या फलंदाजीच्या जोरावर किल्ला लढवत आपल्या संघासाठी विजयी धावसंख्या उभी करतात. तर काही फलंदाज असे असतात, जे काहीच धावा करून बाद होतात. फलंदाज जितक्या धावा करतील, ते तितकेच आपल्या संघासाठी फायद्याचे ठरते. यावरून समजते, की फलंदाजांनी कसोटीत दमदार कामगिरी करणे संघासाठी किती महत्त्वाचे असते. याबरोबरच वेळ आल्यास गोलंदाजही बॅटने आपला जलवा दाखविण्यात मागे पडत नाहीत.
असेच काही फलंदाज भारतीय संघात आहेत, ज्यांनी पहिल्या फलंदाजापासून ते दहाव्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करत संघासाठी धावा करताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या ४ भारतीय फलंदाजांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. याला इंग्रंजी भाषेत carried the bat असेही म्हणतात.
पहिल्या फलंदाजापासून दहाव्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करणारे ४ फलंदाज- Indian Batsmen who carried the bat for India in Test matches
४. चेतेश्वर पुजारा (नाबाद- १४५, विरुद्ध- श्रीलंका, २०१५)
भारतीय संघाचा वरच्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मुरली विजयच्या अनुपस्थितीत केएल राहुलबरोबर (KL Rahul) भारताकडून सलामीला फलंदाजी केली. डाव जसजसा पुढे सरकत होता, तसतसे नियमित अंतराने भारतीय संघ विकेट्स गमावत होता. परंतु पुजारा एका बाजूने भक्कमपणे उभे राहून भारताचा डाव सांभाळत होता. त्याने पुढे अमित मिश्राबरोबर (Amit Mishra) ८व्या विकेटसाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
त्या सामन्यात पुजाराने दहावा खेळाडू उमेश यादवबरोबरही (Umesh Yadav) फलंदाजी केली होती. अशाप्रकारे तो पहिल्या फलंदाजापासून दहाव्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करणारा भारतीय संघाचा ४था खेळाडू ठरला होता. त्याने पहिल्या डावात २८९ चेंडूंचा पाठलाग करताना नाबाद १४५ धावांची खेळी केली होती. त्यात १४ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीमुळे भारताने सर्वबाद ३१२ धावांपर्यंत मजल मारली होती.
परंतु श्रीलंकेने या धावांचा पाठलाग करताना सर्वबाद २०१ धावाच केल्या. त्यामुळे भारतीय संघाने ११२ धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात २७४ धावा ठोकल्या. त्यामुळे श्रीलंकेपुढे तब्बल ३८६ धावांचा डोंगर उभा राहिला होता. परंतु श्रीलंकेचा डाव २६८ धावांवरच संपुष्टात आल्याने भारतीय संघाने तो सामना ११७ धावांनी जिंकला.
३. राहुल द्रविड (नाबाद-१४६, विरुद्ध- इंग्लंड, २०११)
भारतीय संघाने २०११ साली इंग्लंड दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. त्यातील ४था सामना केनिंग्टन ओव्हल येथे खेळण्यात आला होता. त्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडने (Rahul Dravid) नाबाद १४६ धावांची खेळी केली होती. त्या दरम्यान त्याने डावाची सुरवात विरेंद्र सेहवागबरोबर केली. पुढे तो भारताचा डाव एका बाजूने सांभाळत दहाव्या क्रमांकावरील खेळाडू एस श्रीसंतबरोबरही फलंदाजी करत होता. परंतु द्रविडने केलेल्या खेळीचा भारतीय संघाला काही फायदा झाला नाही. कारण शेवटी तो सामना इंग्लंड संघाने एक डाव आणि ८ धावांनी जिंकला होता.
२. विरेंद्र सेहवाग (नाबाद- २०१, विरुद्ध श्रीलंका, २००८)
भारतीय फलंदाजांना २००८ साली श्रीलंका दौऱ्यावर असताना श्रीलंकन गोलंदाजांसमोर चांगलाच संघर्ष करावा लागला होता. परंतु भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपल्या खेळीने श्रीलंकन गोलंदाजांना नमवले. सेहवागने नाबाद २०१ धावांच्या द्विशतकी खेळी करत भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाची भर पाडली. त्याच्या या द्विशतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात श्रीलंकेसमोर ३३० धावांचे भले मोठे आव्हान ठेवले होते. त्यादरम्यान सेहवागने पहिल्या डावात गौतम गंभीरबरोबर (Gautam Gambhir) १६७ धावांची, तर व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर (VVS Laxman) १०० धावांची भागीदारी रचली होती.
शेवटी तो सामना भारतीय संघाने १७० धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबर केली होती.
१. सुनील गावसकर (नाबाद- १२७, विरुद्ध- पाकिस्तान, १९८३)
भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी १९८३ साली फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यांनी दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजी करताना नाबाद १२७ धावांची शतकी खेळी केली होती. त्यात १९ चौकारांचा समावेश आहे. त्यांनी शेवटच्या फलंदाजापर्यंत एका बाजूने भारतीय संघाचा डाव सांभाळला होता. परंतु भारतीय संघ २८६ धावांवरच संपुष्टात आला आणि पाकिस्ताने ७ धावांचे आव्हान १० धावा करत पूर्ण केले. अशाप्रकारे तो सामना पाकिस्तानने १० विकेट्सने जिंकला होता.