India vs England Lord’s Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. इंग्लंडने हा सामना 22 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघ 193 धावांचा पाठलाग करत होता. भारताचे मुख्य फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. यानंतर रवींद्र जडेजाने नाबाद 61 धावांची खेळी केली, पण तो भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. भारतीय संघाने हा सामना गमावला असला, तरी भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात इतिहास रचला. तसेच, जडेजानेही या सामन्यात मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. (Ravindra Jadeja Lord’s record)
जडेजाने लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचला आहे. जडेजाने या मैदानावर दोन्ही डावांत अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात जडेजाने 72 धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात 61 धावा करून तो नाबाद परतला. लॉर्ड्सच्या मैदानावर दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा जडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1952 मध्ये विनू मांकडने हा पराक्रम केला होता. मांकडने पहिल्या डावात 72 आणि दुसऱ्या डावात 184 धावा केल्या होत्या. (Vinoo Mankad Lord’s)
जडेजाने आता इंग्लंडमध्ये सलग 4 डावात अर्धशतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने दोन्ही डावात अर्धशतक केले. यापूर्वी, त्याने एजबॅस्टन कसोटी सामन्यात पहिल्या डावात 89 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात 69 धावांची नाबाद खेळी केली होती. जडेजा आता इंग्लंडमध्ये सलग 4 किंवा त्याहून अधिक 50+ धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. जडेजापूर्वी रिषभ पंतने सलग पाच 50+ धावा केल्या होत्या, तर सौरव गांगुलीने 2002 मध्ये सलग 4 वेळा 50+ धावा केल्या होत्या.
या सामन्यात जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 611 विकेट्स देखील आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा आणि 600 हून अधिक विकेट्स घेणारा जडेजा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी हा पराक्रम माजी भारतीय खेळाडू कपिल देवने केला होता. कपिल देवच्या नावावर 687 विकेट्स आणि 9031 धावा आहेत. (7000 runs International cricket)





