भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मालिकेत 1 -0 ने पिछाडीवर असून देखील कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात उतरलेल्या भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली. भारताने या सामन्यात मोहम्मद सिराज व शुभमन गिल या दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली होती.
या दोघांनीही आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. विशेषतः वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने ग्लेन मॅग्रा सारख्या दिग्गजांची देखील वाहवा मिळवली आहे. या सामन्यादरम्यान मोहम्मद सिराजने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा भारतीय क्रिकेट इतिहासातील केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सय्यद अली यांनी तब्बल 53 वर्षांपूर्वी ऍडलेडमध्ये 1967 साली पहिला कसोटी सामना खेळताना पाच पेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे मोहम्मद सिराज आणि सय्यद आली हे दोघेही हैदराबाद येथे जन्मले आहेत.
सिराजने या सामन्यात उत्तम गोलंदाजी करताना पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 3 फलंदाजांना बाद केले. पहिल्या डावात त्याने लाब्यूशानेची घेतलेली विकेट सामन्याला कलाटणी देणारी ठरली होती. संपूर्ण सामन्यात सिराजने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठ्या धावा करण्याची कुठलीही संधी दिली नाही. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. कर्णधार अजिंक्यला व संपूर्ण भारतीय संघाला सिराजकडून आगामी सामन्यातही अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
शानदार शुभमन! आशिया बाहेर पदार्पण करताना ‘अशी’ कामगिरी करणारा केवळ चौथाच भारतीय सलामीवीर
कसोटीत १९९ धावांवर बाद होणारा फाफ डू प्लेसिस ठरला अकरावा, पाहा यापुर्वी कुणाचं हुकलंय द्विशतक
पैज लावली तरी चालेल.! रहाणेचं शतक आणि टीम इंडियाचा पराभव, शक्यच नाय…