भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे. गेल्या १४ दिवसांपासून भारतीय संघातील खेळाडू मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होते. हा कालावधी संपला असून, आज (३ जून) भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे.
या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामने खेळायची संधी मिळाली आहे. तर भारताला मात्र, फार काळ सरावाची संधी मिळणार नाही. कारण इंग्लंडला गेल्यावर पुन्हा क्वारंटाईनचे नियम पाळावे लागणार आहेत. याबाबत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले मत मांडले आहे.
भारतीय संघाने शेवटचा कसोटी सामना इंग्लंड संघाविरुद्ध फेब्रुवारी- मार्चमध्ये खेळला होता. या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला ३-१ ने धूळ चारली होती. यापूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
अशातच भारतीय संघाचा विराट कोहलीने म्हटले की, “आम्ही याआधी देखील मालिका सुरू होण्याच्या ३ दिवसांपूर्वी परदेशात पोहचून मालिका खेळलो आहोत. त्या मालिकेत आम्ही चांगली कामगिरी देखील केली आहे. या सर्व गोष्टी मनात सुरूच असतात. असे मुळीच नाही की आम्ही पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळत आहोत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्हाला सर्वांना माहित आहे की, इंग्लंडची परिस्थिती कशी असते. परंतु, आपण जर योग्य मानसिकतेने मैदानात नाही उतरलात तर, पहिल्याच चेंडूवर देखील बाद होऊ शकता किंवा गडी बाद करणे कठीण जाऊ शकते. या सामन्यापूर्वी आम्हाला ४ सरावसत्र मिळाले तरी काही हरकत नाही, कारण सर्व खेळाडू इथे खेळले आहेत.”
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), रिद्धिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅरेबियन बेटावर जन्मलेला पण भारताकडून खेळताना ‘चपळ क्षेत्ररक्षक’ म्हणून नावारुपाला आलेला रॉबिन सिंग
एमएस धोनीने आजपर्यंत केले आहे सर्व टी२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व, पाहा कशी राहिली संघाची कामगिरी
टीव्हीवर ‘त्या’ गोलंदाजाला पाहून वॉर्नरची उडाली झोप; म्हणाला, ‘झोपण्याच्या प्रयत्नात होतो आणि…’