शनिवारपासून (२६ डिसेंबर) ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज’च्या दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात दमदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलिया संघाला १९५ धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात २५ षटकांच्या आतच ३ विकेट्स गमावल्या. परंतु संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत सामना आपल्या बाजूने वळवला. यासह मोठ्या विक्रमाच्या यादीतही त्याचा समावेश झाला आहे.
बॉक्सिंग डे कसोटी ५०पेक्षा जास्त धावा करणारा ठरला पाचवा कर्णधार
मयंक अगरवाल, शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या विकेट्स गेल्यानंतर रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. संघाची परिस्थिती पाहता त्याने बचावात्मक खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परिणामत: १११ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही ५२च्या स्ट्राईक रेटने खेळत तो १०४ धावांवर नाबाद फलंदाजी करत आहे. यामुळे रहाणे हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत ५०पेक्षा जास्त धावा करणारा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे.
सर्वप्रथम माजी भारतीय अष्टपैलू कपिल देव यांनी हा विक्रम केला होता. १९८५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात खेळताना त्यांनी ५०पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यांच्यानंतर सचिन तेंडूलकरने १९९९ मध्ये हा पराक्रम केला होता. तसेच सौरव गांगुली (२००३) आणि विराट कोहली (२०१८) यांचाही या विक्रमाच्या यादीत समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
तत्पुर्वी ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात खास फलंदाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अर्धशतकापर्यंतही पोहोचू दिले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशाने सर्वाधिक ४८ धावा करु शकला. त्याच्या व्यतिरिक्त ट्रॅविस हेड ३८ धावा आणि मॅथ्यू वेडने ३० धावा केल्या. इतर फलंदाज २० धावांचा आकडाही गाठू शकले नाहीत.
भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच फिरकीपटू आर अश्विनने ३ फलंदाजांना तंबूत धाडले. पदार्पणवीर सिराजनेही लॅब्यूशाने आणि कॅमरॉन ग्रीनला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : कर्णधार अजिंक्य रहाणेचं दमदार शतक; ८८ षटकांनंतर भारतीय संघ ७३ धावांनी आघाडीवर
ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर जे कोणत्याही भारतीय फलंदाजाला नाही जमलं, ते एकट्या पंतने करून दाखवलं
व्हिडिओ : नॅथन लायनच्या फिरकीत हनुमा विहारी आडकला, झाला ‘असा’ बाद