इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा भारतीय संघासाठी आणि रवी शास्त्रीसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण या स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय सध्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
रवी शास्त्रीनंतर या पदासाठी माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे होते. परंतु आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. स्वतः अनिल कुंबळे हे पद स्वीकारण्यासाठी इच्छुक नाहीत. तसेच बीसीसीआयच्या काही सदस्यांनी देखील त्यांना पुन्हा प्रशिक्षक बनवण्यासाठी रस दाखवला नाहीये. त्यामुळे बीसीसीआय परदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यापूर्वी ग्रेग चॅपेल हे परदेशी प्रशिक्षक भारतीय संघाला लाभले होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, “अनिल कुंबळे यांना माहीत आहे की, प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा विराट कोहली आणि इतर खेळाडूंसोबत काम करावे लागेल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपद देण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु इतर सदस्य सहमत नसल्याचे पाहायला मिळाले. यासह वीवीएस लक्ष्मणची देखील प्रशिक्षक म्हणून निवड करणे कठीण आहे. म्हणून बीसीसीआय सध्या परदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. परंतु या निर्णयास अजूनही बराच वेळ आहे, येणाऱ्या काळात याबाबत निर्णय घेतला जाईल.”
माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी यापूर्वी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी २४ जून २०१६ रोजी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. या काळात ते वाद विवादात अडकले होते. कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात वाद सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर त्यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून रवी शास्त्री हे संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी
लाईव्ह सामन्यातील ‘त्या’ विवादावरुन कार्तिकने उठवला पडदा, सांगितले का अश्विनवर भडकला मॉर्गन?
केएल राहुलला बाद करताच पोलार्डकडून ३०० व्या टी२० विकेटचे भन्नाट सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ