भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. भारतातल्या गल्लीगल्लीत अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकदा क्रिकेटचा सामना रंगलेला दिसतो. त्यामुळे भारतातील लोक खूप क्रिकेटवेडे असल्याचे मानले जाते. ते कधीकधी त्यांच्या क्रिकेटवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक अनोख्या गोष्टी करताना दिसतात. कधीतरी तर मैदानावर धाव घेत मर्यादाही ओलांडताना दिसतात. तर काहीजणं क्रिकेटपटूंचे पोस्टर भिंतीवर लावतात. नुकतीच अशाच एका रांचीमधील चाहत्याची माहिती समोर आली आहे. या चाहत्याकडे क्रिकेटशी निगडीत अशा ५०० पेक्षाही अधिक गोष्टी आहेत.
क्रिकेटशी जोडलेल्या ५०० पेक्षाही अधिक गोष्टींचा संग्रह
रांचीमधील मुख्य रस्त्यावर राहणाऱ्या ऋषी छाबरा असे क्रिकेट चाहत्याचे नाव असून त्याच्याकडे क्रिकेटशी जोडलेल्या जवळपास ५०० हून विविध गोष्टी आहेत. या गोष्टींमध्ये खेळाडूंच्या जर्सी, सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी वापरले जाणारी नाणी, पुस्तकं, खेळाडूंच्या कॅप यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर १०० पेक्षा अधिक सामन्यांची तिकिटंही आहेत. हे सामने केवळ भारतातीलच नाही तर विदेशातीलही आहेत.
न्यूज १८ लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, ऋषी यांच्याकडे जवळपास खेळाडूंच्या १४० जर्सी आहेत. यात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड अशा अनेक संघांतील खेळाडूंच्या जर्सींचा समावेश आहे. तसेच १९८५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध बेंसेज अँड हेजेस कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याशी जोडलेली एक बॅटही आहे, ज्यावर त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ७ देशांतींल खेळाडूंच्या स्वाक्षरी आहेत. त्या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील रवी शास्त्री यांची कामगिरी प्रसिद्ध आहे.
ऋषी यांच्याकडे सचिनच्याही २ जर्सी आहेत. एका जर्सीवर सचिनने स्वत: स्वाक्षरी केलेली आहे. तर दुसरी जर्सी सचिनने त्याच्या २०० व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यांत घातली होती. याशिवाय ऋषी यांच्याकडे विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, श्रीसंत यांच्याही जर्सी आहेत. तसेच त्यांच्याकडे वनडे सामन्यांतील नाणेफेकीचे ३ नाणी आहेत. तसेच अनेक क्रिकेटवरील पुस्तकं आहेत. प्रत्येक सामन्यापूर्वी एका पुस्तकाची आनावरण केले जाते, ज्यात त्या सामन्याची माहीती असते.
ऋषी यांची पत्नी राधिका देखील क्रिकेटची मोठी चाहती असून हे दोघे पती-पत्नी अनेकदा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशात फिरत असतात.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वविजेता भारतीय क्रिकेटर बालकनीतून उडी मारुन देणार होता जीव, स्वत:च केला धक्कादायक उलगडा
रबाडाच्या अचूक यॉर्कर चेंडूने स्टंप्स चक्काचूर, फलंदाज पोलार्डही बघतच राहिला
भारत वि. पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात घडला होता गंभीर-आफ्रिदीत हाय व्होल्टेज ड्रामा; वाचा किस्सा