ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीपूर्वी भारतीय संघाची परिस्थिती फारशी चांगली दिसत नाहीये. भारतानं या दौऱ्यात वेगळ्या पद्धतीनं सराव करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र यात फलंदाज सपशेल अपयशी होताना दिसत आहेत.
वास्तविक, भारतानं नेट प्रॅक्टिससोबतच मॅच सिम्युलेशनचं नियोजन केलं होतं. याचा अर्थ एखाद्या सामन्याप्रमाणे सेंटर विकेटवर फलंदाजी करणं, ज्यामध्ये सर्व 11 क्षेत्ररक्षक मैदानात असतील. या मॅच सिम्युलेशनमध्ये भारताची बॅटिंग खराब झाली आहे. नवदीप सैनी आणि नितीश रेड्डी यांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना त्रास दिला.
विराट कोहली, केएल राहुल, शुबमन गिल आणि रिषभ पंत यांना कसोटी खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. यशस्वी जयस्वालही आता भारताकडून सातत्यानं खेळत आहे. अशा स्थितीत नवदीप सैनी, नितीश रेड्डी आणि मुकेश कुमार यांच्यासारख्या गोलंदाजांसमोर त्याचं अपयशी होणं चिंताजनक आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वालनं पहिल्याच षटकातच चौकार मारला, मात्र त्याला मोठा डाव खेळता आला नाही. गुड लेन्थचा चेंडू टोलवण्याच्या प्रयत्नात तो दुसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद झाला.
केएल राहुल चांगली फलंदाजी करत होता, मात्र प्रसिद्ध कृष्णाचा एक उसळणारा चेंडू त्याच्या कोपरावर आदळला. 29 धावांवर खेळत असलेल्या राहुलला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. विराट कोहलीनं डावाच्या सुरुवातीला दोन शानदार कव्हर ड्राइव्ह मारले, मात्र नंतर मुकेशच्या बाहेरील चेंडूवर तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. शुबमन 29 धावा करून नवदीप सैनीचा बळी ठरला. रिषभ पंत त्याच्या नैसर्गिक आक्रमक शैलीत खेळत होता, मात्र नितीश रेड्डीनं त्याला 19 धावांवर क्लीन बोल्ड केलं.
भारतापेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन मीडिया या सिम्युलेशन सामन्याचं कव्हरेज करत आहे. ऑस्ट्रेलियालाही भारताची मोठी कमजोरी कळली आहे. भारताचे सर्व आघाडीचे फलंदाज शॉर्ट पिच बॉल्सवर अडचणीत आले. नितीश, नवदीप आणि मुकेश यांसारख्या गोलंदाजांचे शॉर्ट बॉल्स या फलंदाजांना इतके त्रासदायक ठरत असतील, तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचं आव्हान किती कठीण असेल याचा विचार करा.
हेही वाचा –
रिषभ पंतचा बाउन्सर, जसप्रीत बुमराहचा षटकार? सरावादरम्यानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
IND vs SA: चाैथ्या टी20 मध्ये जोहान्सबर्गची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!
चौथ्या टी20 मध्ये संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या