सध्या भारताचे दोन क्रिकेट संघ वेगवेगळ्या देशांमध्ये खेळत आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज पंकज सिंग याने एका निवेदनाद्वारे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषणा केली आहे. पंकज सिंग याने दोन कसोटी व एका वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सततच्या दुखापतीमुळे तसेच कोरोनामुळे जास्त क्रिकेट होत नसल्या कारणाने त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता
पंकज सिंग याने सार्वजनिक केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा दिवस येतो ज्या दिवशी त्याला थांबायचे असते. अतिशय जड अंतकरणाने व संमिश्र भावनांनी मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा करत आहे. माझ्यासाठी हा दुखद दिवस असला तरी, सर्वांचे आभार मानणे गरजेचे आहे.’
तो पुढे म्हणाला, ‘राजस्थानसाठी, आयपीएलमध्ये आणि देशासाठी खेळायला मिळाले हे माझे भाग्य समजतो. राजस्थान रणजी संघासोबत माझे नाते १५ वर्षापर्यंत राहिले. हा प्रवास सुखकारक होता.’
पंकज सिंग याने २०१०-२०११ व २०११-२०१२ अशी सलग दोन वर्ष राजस्थानला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अशी राहिली कारकीर्द
उंचपुरा वेगवान गोलंदाज असलेला पंकज सिंग आपल्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने ११७ प्रथमश्रेणी सामने खेळताना ४७२ बळी आपल्या नावे केले. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याच्या नावे ११८ बळी जमा आहेत. आयपीएलमध्ये देखील त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ११ बळी मिळवले होते. २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याला भारतीय संघाकडून कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली. या दोन सामन्यात तो केवळ दोन बळी मिळवू शकला होता. २०१० मध्ये त्याने भारतासाठी एकमेव वनडे श्रीलंकेविरुद्ध खेळलेला.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या ‘त्या’ बॅटवर लागली होती कोटींची बोली, गिनीज बुकमध्ये आहे नोंद
अफलातून! न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने डाइव्ह मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ