मुंबई। टी २० मुंबई लीगसाठीचा लिलाव आज बांद्रा हॉटेलमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत मुंबईकर अजिंक्य रहाणेही सहभागी होणार आहे. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी सर्वच फ्रँचायझी उत्सुक होते.
अखेर मुंबई नॉर्थ संघाने ७ लाखांची बोली लावत रहाणेला आपल्या संघात सामील करून घेतले. रहाणेची ६ मार्च पासून श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी निवड झाली नसल्याने तो या स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहे.
या लीगसाठी लिलावात राहाणेची मूळ किंमत ४ लाख रुपये होती. पण त्याला त्याच्या मूळ किमतीपेक्षा ३ लाख रुपये जास्त मिळाले आहेत. राहणे या लीगमधील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच मुंबई नॉर्थ या संघाकडून त्याच्या बरोबर पृथ्वी शॉ सुद्धा खेळणार आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार असलेल्या पृथ्वीला मुंबई नॉर्थ संघाने २,८०,००० रुपयांना विकत घेतले आहे.
आज दूपारी २ वाजता T20 मुंबई लीग लिलावाला सुरूवात झाली. हे लिलाव T20 Mumbai च्या फेसबुक पेजवर चाहत्यांसाठी लाईव्ह करण्यात आले आहेत.
ह्या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होणार असून यापुर्वीच संघ मालकांची नावे घोषीत करण्यात आली आहे.
ही लीग ११ मार्च ते २१ मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या अंतराने आयपीएललाही सुरुवात होणार आहे.
काल या स्पर्धेतील संघमालकांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या स्पर्धेचा ब्रॅन्ड अॅंबेसिडर आहे.