रविवारी (1 जानेवारी) जगभरात नव्या वर्षाचे स्वागत केले जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देत 2023 मध्ये आगमन केल्यानंतर, संपूर्ण जगात ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण तयार झाले. अनेकांनी जोडून आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेत विविध नियोजन केले होते. त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील या नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत दिमाखात केले. कोणी देशात तर कोणी परदेशात आपल्या कुटुंबासह या नववर्षाच्या सुरुवातीचा आनंद लुटला.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हा मागील काही दिवसांपासून दुबईमध्ये आहे. पत्नी अनुष्का व मुलगी वामिका यांच्यासह त्याने सरत्या वर्षाला निरोप दिला. आपल्या कुटुंबाचे एक छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा देखील जवळपास पंधरा दिवसांपासून दुबईत आपल्या मित्र व परिवारासह आनंद लुटताना दिसतोय. नव्या वर्षाचे स्वागत हे त्याने तेथूनच केले.
नुकतीच आयसीसीकडून सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी नामांकित झालेली भारतीय महिला संघाची उपकर्णधर स्मृती मंधाना ही काश्मिर येथे नववर्षाचा आनंद साजरा करताना दिसली. तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवणारा भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हा आपल्या कुटुंबासह युरोपमध्ये पोहोचला आहे. त्याने तेथूनच नव्या वर्षाचा आनंद साजरा केला. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग हा आपली पत्नी व मुलासह मागील आठवडाभरापासून अमेरिकेत आहे. ख्रिसमसनंतर या कुटुंबाने नवीन वर्ष ही अमेरिकेतूनच साजरे केले.
(Indian Cricketers Celebrate New Year From Various Places)