भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. युएईमध्ये मागील आठवड्यात पार पडलेल्या आयपीएल २०२० दरम्यान घेण्यात आलेल्या खेळाडूंच्या डोपिंग टेस्टचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामावेळी एकूण ५४ खेळाडूंची डोपिंग टेस्ट करण्यात आली होती. नाडाचे संचालक नवीन अग्रवाल यांनी सर्व खेळाडूंच्या ‘डोप टेस्ट’ निगेटिव आल्याची माहिती दिली आहे.
प्रथमच आयपीएलवेळी करण्यात आल्या होत्या ‘डोपिंग टेस्ट’
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था म्हणजेच नाडाने प्रथमच आयपीएलवेळी खेळाडूंच्या डोपिंग टेस्ट केल्या होत्या. यामध्ये त्यांना युएई उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने मदत केली. खेळाडूंच्या लघुशंकेचे व रक्ताचे नमुने पुढील चाचणीसाठी जर्मनी येथील कोलन लॅब येथे पाठवले गेलेले. या सर्व नमुन्यांचा अहवाल तीन दिवसात येणे अपेक्षित होता. मात्र, काही कारणास्तव त्याला उशीर झाला.
एकूण ५४ खेळाडूंची झाली होती टेस्ट; धोनी, विराट, रोहितचा होता समावेश
एकूण ५४ नमुन्यांपैकी ४८ नमुने हे ऑक्टोबर महिन्यात, तर ६ नमुने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आले होते. या खेळाडूंमध्ये राष्ट्रीय खेळाडूंसह काही मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा देखील समावेश होता. या मोठ्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांचा समावेश होता. आनंदाची गोष्ट म्हणजे या सर्व खेळाडूंचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
नाडाने जून महिन्यात काही प्रमुख भारतीय खेळाडूंचा रजिस्टर टेस्टिंग पूलमध्ये समावेश केला होता. या पूलमध्ये समाविष्ट क्रिकेटपटूंनी आपल्या निवासाचे पत्ते त्यावेळी दिले नव्हते. त्या कारणाने, नाडाने चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि केएल यांच्यासह पाच खेळाडूंना नोटीस बजावली होती.
नाडाने आयपीएलपूर्वीच स्पष्ट केले होते की, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर आमची नजर असेल. त्यानुसार या सर्व ५४ खेळाडूंची डोपिंग टेस्ट केली गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सोपी खेळपट्टी मिळणार? पाहा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू काय म्हणतोय
… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर
मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण