एफआयएच ज्यूनियर हॉकी विश्वचषक २४ नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला फ्रान्सस़बत सामना खेळावा लागेल. हा विश्वचषक भुवनेश्वर मधील कालिंगा स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. भारतीय संघ स्पर्धेच्या ग्रुप बी मध्ये आहे आणि या गटात संघाला फ्रान्स, कॅनाडा आणि पोलंड या संघासोबत सामने खेळायचे आहेत. भारताला पहिला सामना २४ नोव्हेंबर, दुसरा सामना २५ नोव्हेंबर आणि २७ नोव्हेंबरला तिसरा सामना खेळायचा आहे. भारताने यापूर्वी २०१६ मध्ये हा विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होता आणि चाहत्यांना यावर्षीही संघाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
भारताने या विश्वचषकासाठी २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्या संघात खेळलेला विवेक सागर प्रसाद सहभागी आहे आणि त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी टाकली गेली आहे. या विश्वचषकात भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा जूनियर हॉकी संघ देखील भारत दौऱ्यावर आला आहे. पाकिस्तान ग्रुप डी मध्ये सहभागी आहे आणि या गटात त्यांच्यासोबत जर्मनी, इजिप्त आणि अर्जेंटिना हे संघ आहेत. पाकिस्तान संघाने यापूर्वी करतारपुर कॉरीडॉर स्पर्धा खेळली आहे आणि त्यानंतर काही दिवसांतच संघ भारतात आला आहे.
असे असतील सामने
भारत विरुद्ध फ्रान्स २४ नोव्हेंबर (रात्री ७.३० वाजता)
भारत विरुद्ध कॅनडा २५ नोव्हेंबर (रात्री ७.३० वाजता)
भारत विरुद्ध पोलंड २७ नोव्हेंबर (रात्री ७.३० वाजता)
पाकिस्तानला त्यांचा पहिला सामना २४ नोव्हेंबर, दुसरा सामना २७ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबरला तिसरा सामना खेळायचा आहे. या विश्वचषकादरम्यान विदेशी संघांना कोरोनाची नियमावली लागू केली गेली नाही. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघ रविवारी चिली संघासोबत सराव सामना खेळला आहे. स्पर्धेचे वरिष्ठ अधिकारी अफताब हसन खान यांनी पाकिस्तान संघाचे विश्वचषकासाठी स्वागत केले आहे. या विश्वचषकादरम्यान कोरोना संक्रमण टाळण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली गेली नाही. सर्व प्रेक्षकांनी घरी बसून सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केली आहे.