चेन्नई – हरमीत देसाईने दमदार पुनरागमन करताना, यांगझी लियूसोबत मिश्र दुहेरीत दणदणीत विजय मिळवून गतविजेत्या ॲथलीड गोवा चॅलेंजर्स संघाला इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस लीग २०२४ मध्ये विजयी सुरुवात करून दिली. गतविजेत्या संघाने जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर नवोदित जयपूर पॅट्रियट्सचा पराभव केला.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशन (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित लीगचा प्रचार केला आहे.
गोवा चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकली. पुरुष एकेरीत कर्णधार हरमीतने इंडियन ऑइल UTT 2024 चा पहिला गुण मिळवला. भारतीय स्टार पॅडलरने चो सेउंग-मिनविरुद्ध ५-० अशी आघाडी घेतली आणि पहिला गेम ११-२ च्या स्कोअरलाइनने जिंकला. चो सेउंग मिनने दुसऱ्या गेममध्ये प्रत्युत्तर दिले. पदार्पण करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या खेळाडूने त्वरीत मोठी आघाडी मिळवली आणि गेम ११-१ असा जिंकून लढत १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर निर्णायक गेममध्ये सेउंग मिनने जबरदस्त खेळ करून ११-५ असा गेम जिंकून संघाला २-१ असा विजय मिळवून दिला.
अदम्य लिऊने महिला एकेरीत अनुभवी सुथासिनी सावेताबुतचा ३-० असा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला आघाडी मिळवून दिली.
हरमीत/ लिऊ आणि सुथासिनी/ रोनित भांजा यांच्यात मिश्र दुहेरीचा सामना झाला. हरमीत आणि लिऊ यांनी त्यांचा पहिला सामना एकत्र खेळताना, पहिला गेम ११-१ ने जिंकण्यासाठी अविश्वसनीय समन्वय दाखवला. सुथासिनी व रोनित जोडीने दुसरा गेम ११-६ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. हरमीत व लिऊ यांनी निर्णायक गेममध्ये ११-७ असा विजय मिळवताना जयपूर पॅट्रियट्सच्या जोडीला धूळ चारून सामना जिंकला.
रोनितने चौथ्या सामन्यात (पुरुष एकेरी) ॲथलीड गोवा चॅलेंजर्सच्या मिहाई बोबोसिकाचा मुकाबला केला. दोन वेळचा ऑलिम्पियन बोबोसीकाने पिछाडीवरून २-१ ने विजय मिळवत आपल्या संघाची आघाडी आठ गुणांवर वाढवली आणि संघाला टाय विजय मिळवून दिला.
यशस्विनी घोरपडे आणि नित्यश्री मणी यांच्यातील महिला एकेरी सामन्यात इंडियन ऑइल UTT 2024 चा पहिला गोल्डन पॉईंट पाहायला मिळाला. पण, नित्यश्रीने २-१ असा विजय मिळवला.
नवोदित अहमदाबाद एसजी पायपर्स त्यांच्या इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस २०२४ मोहिमेची सुरुवात उद्याच्या दुहेरी हेडरच्या पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण टेबल टेनिस विरुद्ध सायंकाळी ७ वाजता करतील. त्यानंतर पीबीजी बंगळुरू स्मॅशर्स विरुद्ध यजमान चेन्नई लायन्स असा सामना होईल.
इंडियन ऑइल UTT 2024 चे थेट प्रक्षेपण Sports18 Khel चॅनेलवर आणि JioCinema (भारत) आणि Facebook Live (भारताबाहेर) वर ऑनलाइन माध्यमांवर केले जाईल. तिकिटे BookMyShow वर ऑनलाइन आणि चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममधील गेट नं. १ जवळ ऑफलाइन उपलब्ध आहेत. ही लीग पुढील १७ दिवस चालेल आणि ७ सप्टेंबर रोजी अंतिम सामना होईल.
संक्षिप्त स्कोअर
ॲथलीड गोवा चॅलेंजर्स विरुद्ध जयपूर पॅट्रियट्स ९-६ :
हरमीत देसाई पराभूत वि. चो सेउंग-मिन १-२ ( ११-२, १-११, ५-११); यांगझी लिऊ विजयी वि. सुथासिनी सावेताबुत ३-० ( ११-३, ११-६, ११-४ ); हरमीत/लिऊ विजयी वि. रोनित/सुथासिनी २-१ ( ११-१, ६-११, ११-७); मिहाई बोबोसिका विजयी वि. रोनित भांजा २-१ ( ८-११, ११-७, ११-५); यशस्विनी घोरपडे पराभूत वि. नित्यश्री मणी १-२ ( १०-११, ११-५, ७-११).