सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याची लढत अत्यंत रोमांचक घडीवर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत भारतापुढे ४०७ धावांच्या आव्हानाचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघ चौथ्या दिवसाखेर (१० जानेवारी) २ बाद ९८ धावांवर आहे. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद फलंदाजी करत आहेत.
रोहित-गिलची दोन्ही डावात अर्धशतकी भागिदारी
या सामन्यात भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दोन्ही डावात अर्धशतकी भागिदारी रचत खास कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भल्यामोठ्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित-गिलने ७१ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवुड याने टीम पेनच्या हातून ३१ धावांवर गिलला झेलबाद करत त्यांची भागिदारी मोडली.
तत्पुर्वी पहिल्या डावातही रोहित आणि गिलने ७० धावांची भागिदारी साकारली होती. यावेळी २६.६ षटकात हेजलवुडने स्वत:च रोहितचा झेल पकडत अवघ्या २६ धावांवर त्याला माघारी धाडले होते. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात या सलामीवीरांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागिदारी रचण्याचा खास विक्रम केला.
तब्बल ५२ वर्षांपुर्वी झाली होती दोन्ही डावात ५० पेक्षा अधिक धावांची भागिदारी
यापुर्वी आबिद अली आणि फारुख इंजिनियर या भारतीय कसोटी संघाच्या सलामी जोडीने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी केली होती. १९६८ साली सिडनीमध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्यांनी ५६ आणि दुसऱ्या डावात ८३ धावांची भागीदारी केली होती.
त्यानंतर गेल्या ५२ वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना सलामीला खेळताना प्रत्येकवेळी किमान एकतरी फलंदाज अर्धशतकी भागिदारी होण्याच्या आत एकातरी डावात बाद होत होता. अखेर रोहित आणि गिलने दोन्ही डावात अर्धशतकी भागिदारी रचत या नकोशा कामगिरीला खंड पाडला.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टीव स्मिथची कमाल; ‘ही’ खास कामगिरी करत दिग्गजांची केली बरोबरी
ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ तयार, पण असेल ‘ही’ अट





