नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघात असे काही महान खेळाडू झाले आहेत, ज्यांचा चाहता वर्ग जगभर पसरलेला आहे. आपल्या खेळाच्या अनोख्या शैलीने त्यांनी देशाच्या सीमा ओलांडून जगभरातील चाहत्यांना आपलेसे केले आहे. परंतु, जगात असेही काही खेळाडू आहेत. ज्यांचे मुळ भारतीय आहे, परंतु ते इतर देशांच्या संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत किंवा केले आहे. इतकेच नव्हे तर त्यातील काही खेळाडूंनी त्या त्या देशाच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व देखील केलेले आहे.
या लेखात आपण असे पाच खेळाडू पाहणार आहोत. ज्यांचे मुळ भारतीय आहे. परंतु, ते इतर देशातील संघासाठी क्रिकेट खेळले आहेत, अथवा खेळत आहे. तसेच या पाचही खेळाडूंनी त्या त्या देशाच्या संघांचे यशस्वी नेतृत्व देखील केलेले आहे.
तसे पाहता मुळ भारतीय असलेले म्हणजेच भारतीय वंशाचे परंतु इतर देशासाठी क्रिकेट खेळणारे भरपूर खेळाडू आहेत. परंतु, यातील मोजक्याच खेळाडूंना त्या देशात राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
1. नासिर हुसैन – इंग्लंड
भारतीय वंशाचे परंतु इंग्लंड संघाचे महान खेळाडू म्हणून नासिर हुसैन यांचे नाव घेतले जाते. नासिर हे इंग्लंड संघाचे पुर्व कर्णधार देखील राहिलेले आहेत.
नासिर यांचा जन्म भारतातील चेन्नई या शहरात झाला होता. मात्र, ते सात वर्षांचे असतानाच त्यांचे कुटुंबीय इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. नासिर हुसैन यांनी 1990 साली इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांना पुढे जाऊन इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील त्यांना मिळाली.
नासिर हुसैन यांनी तब्बल 45 कसोटी व 56 वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केले होते. नासिर यांनी आपल्या करिअरमध्ये एकुण 96 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 5,764 धावा केल्या असून त्यात 14 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच नासिर यांनी 88 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्यात नासिर यांनी 1 शतक आणि 16 अर्धशतकांसह 2,332 धावा केल्या आहेत.
2. हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत हाशिम आमलाचा समावेश होतो. मात्र, हाच हाशिम आमला मुळ भारतीय वंशाचा नागरिक आहे. आमलाचे कुटुंबीय मुळ गुजरात येथील एका मुस्लिम कुटुंबाच्या नात्यातील आहे.
आमलाने दक्षिण आफ्रिका संघाचे १४ कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यात ४ वेळा आफ्रिका संघाला विजय प्राप्त झाला आहे. तसेच आमलाने ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि २ टी-ट्वेंटी सामन्यात देखील दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केलेले आहे.
हाशिम आमलाची गणना फक्त दक्षिण आफ्रिकेच्याच नाही, तर जगातील महान फलंदाजामध्ये होते. आमलाने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकूण १२४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने तब्बल २८ शतके झळकावली आहेत. त्याचप्रमाणे आमलाने १८१ एकदिवसीय सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ज्यात त्याने 27 शतके ठोकली आहेत. आमलाने 44 ट्वेंटी-ट्वेंटी सामने देखील खेळले आहेत.
3. आसिफ करिम – केनिया
केनिया संघाचा भरवशाचा खेळाडू म्हणून आसिफ करिम याचा लौकीक आहे. केनियात जन्म झालेल्या आसिफ करिमचे मुळ मात्र भारतीयच आहे. 1996 च्या एका सामन्यातून आसिफने केनिया संघाकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे जाऊन आसिफने केनिया संघाचे नेतृत्व देखील केले. महत्वाचे म्हणजे आसिफ करिमच्याच नेतृत्वाखाली 1999 साली केनियाचा संघ विश्वचषकाचे सामने खेळला होता.
करिमने एकूण 21 सामन्यांमध्ये केनिया संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 6 सामने केनिया संघाने जिंकलेले आहेत. आसिफ करिमने आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 228 धावा केल्या असून त्यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे आसिफच्या खात्यात 27 विकेट जमा आहेत.
4. रोहन कन्हाई – वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार रोहन कन्हाई याचे मुळ देखील भारतीयच आहे. भारत स्वतंत्र होण्यापुर्वी रोहनचे संपुर्ण कुटुंब वेस्ट इंडीजच्या गोएन्ना या शहरात स्थायिक झाले होते.
रोहन कन्हाई याने वेस्ट इंडीज संघासाठी एकूण 79 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने तब्बल 6,227 धावा केल्या आहेत. यामध्ये 15 शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहन कन्हाई याने 13 कसोटी सामन्यात वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले आहे. कन्हाईच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघाने 3 सामने आपल्या खिशात टाकले होते. आजही रोहन कन्हाईचे नाव वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज म्हणून घेतले जाते.
5. आशिष बगई – कॅनडा
आशिष बगई याचा जन्म दिल्ली येथे झाला होता. मात्र, त्याचा परिवार पुढे जाऊन कॅनडा येथे स्थायिक झाला. क्रिकेटची आवड असणारा आशिष तिथेही क्रिकेटचा सराव करत होता. पुढे जाऊन त्याने कॅनडाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. इतकेच नाही तर, बगई याने तब्बल 6 वर्षे कॅनडा संघाचे नेतृत्व केले आहे. आशिष बगई याने कॅनडा संघाकडून 62 एकदिवसीय आणि 9 ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.