हेमिल्टन। महिला विश्वचषक सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. या विश्वचषकात शनिवारी भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात सेडन पार्क येथे सामना पार पडला. या सामन्यात खेळताना भारतीय दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी हिने मोठा विश्वविक्रम केला आहे. झुलन आता महिला विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनली आहे.
वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदला डावाच्या ३६ व्या षटकात झुलनने बाद केले. याबरोबरच झुलनने विश्वचषकात ४० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ती महिला विश्वचषकात ४० विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज बनली आहे. हा विक्रम करताना तिने ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टन यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. लिन यांनी १९८८ साली महिला विश्वचषकात ३९ विकेट्स पूर्ण केल्या होत्या. आता ३४ वर्षांनंतर झुलन गोस्वामीने त्यांचा हा विक्रम मोडला आहे.
महिला विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाज
४० विकेट्स – झुलन गोस्वामी (भारत)
३९ विकेट्स – लिन फुलस्टन (ऑस्ट्रेलिया)
३७ विकेट्स – कॅरोल हॉज (इंग्लंड)
३६ विकेट्स – क्लेर टेलर (इंग्लंड)
३३ विकेट्स – कॅथरीन फिट्झपॅट्रिक (ऑस्ट्रेलिया)
वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स झुलनच्याच नावावर
झुलन गोस्वामी केवळ विश्वचषकातच नाही, तर महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. तिने १९८ वनडे सामन्यांत २१.८३ च्या सरासरीने २४९ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे ती महिला वनडेमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारी सध्यातरी एकमेव गोलंदाज आहे. तिने आत्तापर्यंत २ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला आहे.
भारताचा वेस्ट इंडिजवर विजय
शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या महिला विश्वचषकाच्या सामन्यात भारताने १५५ धावांनी विजय मिळवला आहे. २०२२ विश्वचषकातील भारताचा दुसरा विजय आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३१७ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून हरमनप्रीत कौरने १०९ आणि स्म्रीती मंधनाने १२३ धावांची शतकी खेळी केली. तसेच वेस्ट इंडिजकडून अनिसा मोहम्मदने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ३१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला ४०.३ षटकात १६२ धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून डिएंड्रा डॉटिनने ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच हेली मॅथ्यूजने ४३ धावांची खेळी केली. या दोघींव्यतिरिक्त अन्य कोणालाच २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मेघना सिंगने २ विकेट्स घेतल्या. याबरोबरत झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि पुजा वस्त्राकरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
हरमनप्रीत कौरचा वेस्ट इंडिजला दे दणादण, विश्वचषक सामन्यात शतक झळकावत बनली अव्वल
हरमनप्रीतचा मोठा पराक्रम! १०९ धावांची खेळी करताच विश्वचषकात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय
स्म्रीती मंधनाचे रेकॉर्डब्रेक शतक! विश्वचषकात १२३ धावांच्या खेळीसह तीन विक्रमात पटकावले अव्वल स्थान