रविवारी निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली. या विजयाबरोबरच दिनेशने एक खास विक्रम केला आहे.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ किंवा ६ धावांची गरज असताना षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांपैकी दिनेश तिसराच खेळाडू ठरला आहे.
याआधी अरुण कार्तिक आणि एम एस धोनी या भारतीय खेळाडूंनी ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे. अरुण कार्तिकने ही कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळताना २०११च्या चॅम्पिअन्स लीग टी२० मध्ये केली होती. तर एम एस धोनीने २०१६ च्या आयपीएल मोसमात रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळताना हा पराक्रम केला होता.
विशेष म्हणजे एम एस धोनी, अरुण कार्तिक आणि दिनेश कार्तिक हे तिघेही यष्टीरक्षक फलंदाज आहेत.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ किंवा ६ धावांची गरज असताना षटकार मारणारे भारतीय फलंदाज:
अरुण कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)- चॅम्पिअन्स लीग टी२०, २०११
एम एस धोनी(रायझिंग पुणे सुपरजायंट्स)- आयपीएल २०१६
दिनेश कार्तिक (भारत)- निदाहास ट्रॉफी २०१८