दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने पार पडले असून तिसरा सामना मंगळवारी (१४ जून) विजाग येथे खेळला जाणार आहे. यजमान भारतीय संघ सध्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. पहिल्या दोन्हीही सामन्यात काही भारतीय खेळाडूंचे वैयक्तिक प्रदर्शन चांगले राहिले आहे, परंतु त्यांना इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
याखेरीज कधी फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, तर त्याचवेळी गोलंदाजांनी निराशा केली, यामुळे हातात असलेला सामना गमावण्याची वेळ भारतीय संघावर ओढावली आहे. अशाच काही कारणांचा आढावा या लेखात घेण्यात आला (Team India Defeat Reasons) आहे.
पहिल्या टी२० सामन्यात गोलंदाजांनी केली निराशा
दिल्ली येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात (First T20I) फलंदाजांचे प्रदर्शन चांगले राहिले होते. परंतु गोलंदाजांनी निराशा केली होती. भारतीय संघाच्या २१२ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना गोलंदाजांना फक्त ३ विकेट्स घेता आल्या होत्या. या तिन्ही विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांनी भरमसाट धावाही लुटल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने ४ षटके फेकताना तब्बल ४३ धावा देत १ विकेट घेतली होती. तर हर्षल पटेलने ४३ धावा देत एक विकेट आणि अक्षर पटेलने ४० धावा देत १ विकेट घेतली होती. याशिवाय युझवेंद्र चहल, आवेश खानसारख्या गोलंदाजांना विकेट्स घेण्यात अपयश आले होते.
भारतीय संघात एकजुटतेची कमतरता
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे कोणत्या एका खेळाडूच्या प्रदर्शनाच्या जीवावर सामने जिंकणे कठीण असते. भारतीय संघाची परिस्थितीही अशीच काहीशी दिसत आहे. पहिल्या टी२० सामन्यात इशान किशनला वगळता, इतर फलंदाजांनी खास प्रदर्शन केले नव्हते. तर दुसऱ्या टी२० सामन्यात भुवनेश्वर कुमारने एकट्याने ४ विकेट्स घेत संघाच्या विजयाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या होत्या. परंतु इतर गोलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. थोडक्यात भारतीय संघात एकजुटतेची कमी दिसत आहे. परिणामी संघात प्रतिभाशाली खेळाडू असतानाही संघाचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे.
भारतीय संघात नाही कोणतीही जोडी
क्रिकेट सामन्यात सहसा २ खेळाडूंची जोडी मिळून संघाला सामना जिंकवून देताना दिसते. जसे की, आव्हानाचा पाठलाग करताना एमएस धोनी-विराट कोहलीची जोडी असायची किंवा सलामीसाठी रोहित शर्मा-शिखर धवनची जोडी. तसेच गोलंदाजीतही युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने संघाला बरेच सामने जिंकून दिले आहेत. परंतु वर्कलोडमुळे संघात सातत्याने बदल होत आहेत आणि खेळाडूंना त्यांच्या जोडीदारासोबत खेळण्याची संधी मिळत नाहीय, ज्याचे परिणाम चालू टी२० मालिकेत दिसत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
काही कळायच्या आत डॅनीने करिष्माला उचलून घेतले, अन् ‘ते’ कांड झाले, जाणून घ्याच
INDvsSA T20: ‘या’ अष्टपैलू खेळाडूच्या जागी रवी बिश्नोईला खेळवा, भारताच्या माजी दिग्गजाचा सल्ला