गोव्यामध्ये १४ आणि १५फेब्रुवारी २०२६ला होणाऱ्या इंडियन रेसिंग फेस्टिव्हलसाठी (IRF) गोव्याचे रस्ते उच्च-तीव्रतेच्या रेसिंग ट्रॅकमध्ये रूपांतरित होण्याच्या तयारीत असताना, गोवा एसेस जेए रेसिंगचा मालक जॉन अब्राहमने आपले मत व्यक्त केले आहे. त्याच्यामते, घरच्या रस्त्यांवरची रेस मोटरस्पोर्टला अधिक वैयक्तिक बनवते. ही केवळ स्पर्धा नसून अभिमान, जबाबदारी आणि समुदायाशी जोडलेली भावना आहे.
गोवा एसेस जेए रेसिंगचा मालक अब्राहमचा विश्वास आहे की गोव्यातील स्ट्रीट रेस कायमस्वरूपी सर्किटवरील रेसपेक्षा वेगळी भावनिक तीव्रता घेऊन येते. “गोव्यातील स्ट्रीट रेस भावना आणि जबाबदारी पूर्णपणे बदलत आहे,” असे जॉन म्हणाला.
“ही फक्त गुण किंवा पोडियमसाठीची लढत नाही. आपण आपल्या लोकांसमोर, आपल्या शहरात रेस करतो आहोत आणि त्यामुळे इतर कुठेही न जाणवणारी जबाबदारी येते. त्यामुळे ही रेस अत्यंत वैयक्तिक बनते,” असे जॉनने पुढे सांगितले.
जॉनच्या मते, स्ट्रीट रेसिंगसाठी आजूबाजूच्या वातावरणाचा अधिक सन्मान आवश्यक असतो. “कायमस्वरूपी सर्किटच्या तुलनेत स्ट्रीट रेसिंग अधिक अरुंद आणि कठोर असते. रस्ते, अडथळे आणि ज्या वातावरणात आपण रेस करतो त्याचा आदर करावा लागतो. यामुळे शिस्त आणि नम्रता येते आणि तेच याला खास बनवते,” असे त्याने म्हटले आहे.
गोव्यासाठी ही रेस केवळ मोटरस्पोर्टपुरती मर्यादित नसल्याचेही जॉन सांगतो. “गोवा आधीच समुद्रकिनारे आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. आता तो जागतिक दर्जाच्या क्रीडेसाठीही ओळखला जात आहे. अशा स्पर्धांमुळे गोवा भारताच्या क्रीडा नकाशावर ठळकपणे दिसू लागतो. या दृश्यतेमुळे पर्यटनाला चालना मिळते, जागतिक लक्ष वेधले जाते आणि राज्याला नवी ओळख मिळते.”
गोवा स्ट्रीट रेससाठीची तयारी ही प्रयोगांपेक्षा अचूकता आणि विश्वासावर आधारित असल्याचे जॉन सांगतो. “स्ट्रीट सर्किटवर रेसदरम्यान प्रयोग करण्यास वाव नसतो. तयारी आधीच पूर्ण असावी लागते. ड्रायव्हर्सना प्रत्येक फेरीसोबत आत्मविश्वास वाढवावा लागतो आणि गाडीवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. हा ट्रॅक आक्रमकतेपेक्षा शिस्तीला जास्त बक्षीस देतो,” असेही जॉनने स्पष्ट केले आहे.
स्ट्रीट रेसिंगमधील दडपण संपूर्ण संघासाठी आव्हान वाढवते. एक छोटीशी चूक तुमची रेस संपवू शकते, असे मत मांडताना जॉनने म्हटले, “ही वास्तवता लक्ष अधिक तीव्र करते. मालक म्हणून, शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. स्ट्रीट रेसिंग कमकुवत बाजू पटकन उघड करते; पण योग्य तयारी असलेल्या संघातील सर्वोत्तम गुणही समोर आणते.”
गोवा एसेस जेए रेसिंग आपल्या घरच्या फेरीत मजबूत आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या संघासह उतरणार आहे. संघाचे नेतृत्व राऊल हायमन करत असून तो इंडियन रेसिंग लीगच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ड्रायव्हर आणि दोन वेळचा विद्यमान विजेता.
“राऊलला दडपण हाताळण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक आहे. त्याचा अनुभव आणि शांत दृष्टिकोन स्ट्रीट सर्किटवर अमूल्य आहे,” जॉन सांगतात. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या, पाचव्या पिढीचे भारतीय असलेल्या हायमनकडे सातत्य आणि विजेतेपदाचा अनुभव आहे.





