इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी कित्येक खेळाडूंची अदलाबदली होत असते. काही संघांमध्ये नविन चेहरे येतात, तर काही खेळाडूंना आपल्या जुन्या संघाने सोडल्यामुळे दुसऱ्या संघात जागा मिळते. तर काहींना कोणीही खरेदीदार न मिळाल्याने ते अनसोल्ड राहत असतात. आयपीएल २०२१ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांच्या अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याला रिलीज केले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सने २.४० कोटी खर्च करत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते.
आज (१ मे) हाच पियुष चावला त्याच्या जुन्या संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरु शकतो. आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिमयवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२१ चा २७ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चावलाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिल्यास तो धुमाकूळ घालताना दिसू शकतो.
आयपीएल २०२० मध्ये या ३२ वर्षीय गोलंदाजाने एमएस धोनीच्यचा नेतृत्त्वाखाली ७ सामने खेळताना ६ फलंदाजांना बाद केले होते. यादरम्यान त्याने १९१ धावा खर्च केल्या होत्या. तसेच ३३ धावांवर २ विकेट्स ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली होती.
चार संघांचे केले आहे प्रतिनिधित्व
तसे तर, चावला हा पहिल्या हंगामापासून आयपीएलचा सदस्य आहे. त्याने २००८ साली पंजाब किंग्जकडून चेन्नईविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. पुढे त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही प्रतिनिधित्त्व केले. अर्थातच आतापर्यंत ४ वेगवेगळ्या संघांकडून खेळण्याचा अनुभव चावलाला आहे.
सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमात टॉप-५ मध्ये
महत्त्वाचे म्हणजे, सलग १३ हंगाम आयपीएलचा सदस्य राहिलेल्या चावलाने विक्रमांचा ढीग रचला आहे. तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत १६४ सामने खेळताना त्याने तब्बल १५६ विकेट्स घेतल्या आहेत. याबाबतीत ड्वेन ब्रावो त्याच्या बरोबरीवर आहे. त्याने १४४ सामन्यात हा किर्तीमान केला आहे. तर लसिथ मलिंगा (१७० विकेट्स) पहिल्या आणि अमित मिश्रा (१६६ विकेट्स) दुसऱ्या स्थानावर आहेत.
अशात या शिलेदाराला आज मुंबई संघाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात संधी मिळते का नाही?, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाच्या गोडव्यात पंजाब किंग्जसाठी कडवी बातमी, पडीक्कलला बोल्ड करणारा ‘हा’ गोलंदाज दुखापतग्रस्त
कोरोनामुळे RRच्या ‘या’ खेळाडूचे आजोबा कालवश, त्यांच्या इच्छापुर्तीसाठी नातवाने घेतला धाडसी निर्णय