भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. पहिला सामना बरोबरीत सुटला तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं 32 धावांनी शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तत्पूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला वाटत आहे की, श्रीलंकेविरुद्ध करा वा मरो तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आव्हानात्मक परिस्थितीत फिरकीच्या धोक्याचा सामना करण्याची मोठी संधी देईल आणि पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघासाठी महत्त्वपूर्ण असेल.
फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे दुसरा सामना 32 धावांनी गमावल्यानंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धची 27 वर्षांतील पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका गमावण्याचा धोका आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. परंतू तो बाद झाल्यानंतर भारतीय संघ ढेपाळला. आता भारतीय संघाला तिसरा एकदिवसीय सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याची गरज आहे.
सुंदर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलाताना म्हणाला की, “आमच्यासाठी मैदानावर येण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची आणि त्या कठीण परिस्थितीत जिंकण्याची ही संधी आहे. तो म्हणाला, साहजिकच आगामी मोठ्या स्पर्धांमध्ये आम्हाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि अशा कठीण परिस्थितीत, विशेषत: अशा परिस्थितीत उत्कृष्ट फिरकी आक्रमणाविरुद्ध आम्ही काय करु शकतो याचा मार्ग शोधणं महत्त्वाचं आहे.”
पुढे बोलताना वाॅशिंग्टन सुंदर म्हणाला की, “मला वाटतं की या मालिकेत आम्ही आतापर्यंत जे काही केलं आहे, त्यातून आम्ही शिकू, साहजिकच आम्ही उद्याचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करु, आमच्याकडे फिरकीविरुद्ध दिग्गज फलंदाज आहेत, फक्त योग्य मार्ग शोधण्याची गरज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या 3 वर्षापासून रोहित शर्माचं क्रिकेटमध्ये वादळ…! आकडेवारी पाहून व्हाल थक्क
तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितच्या खेळण्यावर सस्पेन्स, भारतीय संघाची डोकेदुखी वाढणार!
सराव सत्रात रियानच्या हातात दिसली बॅट, तिसऱ्या वनडेत प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो मोठा बदल