वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका ४-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. अष्टपैलू अक्षर पटेल याला सामनावीर तर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला मालिकावीर म्हणून निवडले गेले.
T20I Series In The Bag 👏 🏆
Smiles All Around 😊 😊#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/GsDf1x8J6I
— BCCI (@BCCI) August 7, 2022
पाचव्या व अखेरचा सामन्याआधीच भारतीय संघाने मालिका आपल्या नावे केली होती. या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह काही खेळाडूंनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. ईशान किशन व श्रेयस अय्यर सलामीला उतरले. ईशान पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र, श्रेयसने संधी साधली. त्याने ४० चेंडूवर ६४ धावांची वेगवान खेळी केली. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक हुडाने अप्रतिम साथ देत ३८ धावा केल्या. मात्र हे दोघे सहा चेंडूंच्या अंतराने माघारी परतले. त्यानंतर संजू सॅमसन, दिनेश कार्तिक व अक्षर पटेल हे चमक दाखवू शकले नाहीत. या सामन्यात नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पंड्याने २८ धावांची खेळी करत संघाला १८८ पर्यंत मजल मारून दिली.
वेस्ट इंडीजने या धावसंख्येच्या पाठलागासाठी वेगळीच रणनीती वापरत जेसन होल्डर याला सलामीला उतरवले. मात्र, तो खातेही न खोलता बाद झाला. शिमरन हेटमायर वगळता एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. हेटमायरने सर्वाधिक ५६ धावांचे योगदान दिले. परिणामी वेस्ट इंडीज संघ १५.४ षटकात १०० धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईने सर्वाधिक चार तर, कुलदीप यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. यासह भारताने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका ४-१ अशी आपल्या नावावर केली.