जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) उर्वरित हंगाम रविवारपासून (१९ सप्टेंबर) संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला जाईल. नेहमीप्रमाणे आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची बरसात होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. युएईतील मैदानी आकाराने छोटी आहेत व त्याचा फायदा फलंदाज घेऊ शकतात.
टी२० क्रिकेटमध्ये फलंदाज अधिक धावा लुटण्यासाठी नेहमी फिरकी गोलंदाजांना लक्ष करताना दिसतात. आज आपण अशाच पाच भारतीय फिरकी गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचले आहेत.
१) पियुष चावला-
आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेला पियुष चावला २००७ पासून आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. त्याने आत्तापर्यंत १५६ बळी मिळवले असले तरी, सर्वाधिक षटकार त्याच्याच गोलंदाजीवर लगावले गेले आहेत. चावलाच्या गोलंदाजीवर आजतागायत १८१ षटकार खेचले गेलेत. या वर्षी तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे.
२) अमित मिश्रा-
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमापासून अवघे पाच बळी दूर असलेला अमित मिश्रा या नकोश्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिश्राने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५४ सामने खेळताना विरोधी फलंदाजांना १७६ षटकार ठोकू दिले आहेत. मिश्रा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करेल.
३) रवींद्र जडेजा-
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाव या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. जडेजाने आयपीएलमध्ये खेळलेल्या १९१ सामन्यांच्या १६२ डावांमध्ये गोलंदाजी करताना ११९ बळी घेतले असले तरी, त्याच्याच गोलंदाजीवर १५६ षटकार ठोकले गेलेत.
४) हरभजन सिंग-
दिग्गज हरभजन सिंगचे नाव या लाजिरवाण्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भज्जीने आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या १६३ सामन्यांच्या १६० डावांमध्ये १५० बळी घेतलेत. या काळात त्याच्या गोलंदाजीवर १४५ षटकार ठोकले गेलेत. मात्र, सरासरी एका सामन्यात एक पेक्षा कमी षटकार त्याच्या गोलंदाजीवर मारले गेले आहेत.
५) युजवेंद्र चहल-
गेल्या अनेक वर्षापासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी पहिल्या पसंतीचा फिरकीपटू म्हणून खेळत असलेला युजवेंद्र चहल या नकोश्या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याच्या गोलंदाजीवर ही हरभजनप्रमाणेच १४५ षटकार विरोधी फलंदाजांनी ठोकलेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकासाठी संघ निवडताना राहुल द्रविडची मदत घेणार निवड समितीचे नवीन चेअरमन, ‘हे’ आहे कारण
जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप