गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) एटीके मोहन बागानची सलग तीन विजयांची घोडदौड जमशेदपूर एफसीने सोमवारी (7 डिसेंबर) खंडित केली. लिथूएनियाचा 33 वर्षीय स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीसने दोन गोलांसह यात सिंहाचा वाटा उचलला. एटीकेएमबीविरुद्ध मोसमात प्रथमच गोल करीत जमशेदपूरने पहिला विजय धडाक्यात साकारला.
वास्को येथील टिळक मैदानावर ही लढत झाली. दहा मिनिटे बाकी असताना फिजीचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर रॉय कृष्णाने एटीकेएमबीची पिछाडी कमी केली, पण अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या संघाला पराभव टाळता आला नाही.
एटीकेएमबीला चार सामन्यांत पहिलीच हार पत्करावी लागली. तीन विजयांसह त्यांचे नऊ गुण व दुसरे स्थान कायम राहिले. जमशेदपूरने चार सामन्यांत पहिलाच विजय नोंदवला असून दोन बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी आठवरून एक क्रमांक प्रगती करीत सातवे स्थान गाठले.
आता चार ते सात अशा चार क्रमांकांवरील अनुक्रमे गोवा, बेंगळुरू, हैदराबाद आणि जमशेदपूर यांचे प्रत्येकी पाच गुण झाले आहेत. यात गोवा, बेंगळुरू आणि हैदराबाद यांचा गोलफरक एक असा समान आहे. जमशेदपूरने केलेले गोल व पत्करलेले गोल 6-6 असून त्यांचा गोलफरक शून्य गोलफरक झाला आहे. या निकालामुळे लिगमधील चुरस कमालीची वाढली आहे.
खाते उघडण्याची शर्यत जमशेदपूरने जिंकली. 30व्या मिनिटाला त्यांना कॉर्नर मिळाला. मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याने चेंडू गोलक्षेत्रात अचूकतेने मारला. त्यानंतर वॅल्सकीसने उडी घेत अचूक टायमिंग साधत ताकदवान हेडिंग करीत एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला चकवले. एटीकेएमबीविरुद्ध झालेला हा मोसमातील पहिलाच गोल ठरला.
दुसऱ्या सत्रात कॉर्नरवरच जमशेदपूरने दुसरा गोल केला. मॉनरॉयने घेतलेल्या कॉर्नरवर मोबाशीरने मारलेल्या चेंडूला वॅल्सकीसने हेडिंगद्वारे नेटची दिशा दिली.
दहा मिनिटे बाकी असताना एटीकेएमबीने पिछाडी कमी केली. 80व्या मिनिटाला कृष्णाने मारलेला चेंडू जमशेदपूरच्या पीटर हार्टलीने कॉर्नरसाठी बाहेर घालवला. मग शुभाशिष बोसने घेतलेल्या कॉर्नरवर बदली खेळाू मानवीर सिंगने बॅकहेडिंग करीत निर्माण केलेल्या संधीचे कृष्णाने चीज केले.
पहिल्या सत्रात खाते उघडण्याच्या आधीच्याच मिनिटाला जमशेदपूरने दमदार प्रयत्न केला. मध्यरक्षक जॅकीचंद सिंगचा क्रॉस शॉट एटीकेएमबीचा बचावपटू प्रीतम कोटल याने ब्लॉक केला. मॉनरॉयने मारलेला चेंडू कॉर्नरसाठ बाहेर गेला. त्यानंतर डावीकडे मिळालेला कॉर्नर मॉनरॉयनेच घेत चेंडू मारला, जो बचाव फळीतील पीटर हार्टली याच्या दिशेने गेला. हार्टलीने मारलेला चेंडू कोटलने रोखला, पण टिरीमुळे जमशेदपूरला आणखी एक कॉर्नर मिळाला.
खाते उघडल्यानंतर दोन मिनिटांत वॅल्सकीसची वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली. टिरीचा पास चुकून थेट जॅकीचंदच्या दिशेने गेला. त्यातून वॅल्सकीसला पास मिळताच त्याने आघाडी फळीतील सहकारी विल्यम लालनूनफेला याच्याकडे चेंडू सोपवला. विल्यमने पुन्हा डावीकडे जॅकीचंदकडे चेंडू मारला. त्यानंतर गोलक्षेत्रात आलेल्या चेंडूवर वॅल्सकीसने हेडिंग केले, पण उजव्या बाजूला आलेला चेंडू अरींदमने झेपावत थोपवला.
सामन्यातील पहिला कॉर्नर पाचव्या मिनिटाला जमशेदपूरला मिळाला. लालडीनलियाना रेंथलेईने मारलेला चेंडू एटीकेएमबीचा बचावपटू शुभाशिष बोस याने बाहेर घालवल्याने पुन्हा कॉर्नर दिला गेला. मॉनरॉयने गोलक्षेत्रात चेंडू मारल्यानंतर हार्टलीने उडी घेत हेडिंग केले, पण हा चेंडू एटीकेएमबीच्या खेळाडूच्या अंगाला लागून बाहेर गेला. त्यातून आणखी एक कॉर्नर दिला गेला. मॉनरॉयने कॉर्नर घेत जॅकीचंदच्या साथीत चेंडू परत मिळविला. त्याने मारलेला चेंडू नेटमध्ये गेला, पण तेव्हा मध्यरक्षक महंमद मोबाशीर ऑफसाईड असल्याचा कौल दिला गेला.
पुढे 13व्या मिनिटाला हार्टलीने विल्यमला पास दिला. विल्यमने चेंडूवर नियंत्रण मिळवले, पण एटीकेएमबीचा बचावपटू संदेश झिंगनने मैदानावर घसरत त्याला रोखले. यानंतरही विल्यमने प्रयत्न केला, पण त्याने जास्त ताकद लावल्यामुळे मोबाशीरला योग्य पास मिळू शकला नाही. यानंतरही मोबाशीरने प्रयत्न केला, पण चेंडू थेट अरींदमकडे गेला.
एटीकेएमबीचा पहिल्या प्रयत्न 18व्या मिनिटाला झाला. टिरीने फ्री किकवर प्रयत्न केला, पण तो जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याला रोखू शकला नाही.
दोन मिनिटांनी जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लीमा आणि एटीकेएमबीचा मध्यरक्षक ग्लॅन मार्टीन्स यांच्यात चेंडूवर ताब्यासाठी चुरस झाली. उजव्या बाजूला झालेल्या या धुमश्चक्रीत लिमाने मार्टीन्सला ढकलले. त्यामुळे एटीकेएमबीला फ्री किक मिळाली. मध्य फळीतील एदू गार्सियाने घेतलेल्या फ्री किकवर मध्यरक्षक कार्ल मॅक्ह्यूजने उडी घेत हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती.
दुसऱ्या सत्रात 51व्या मिनिटाला मार्टिन्सने उजवीकडून आगेकूच केली. त्याने मारलेला चेंडू हार्टलीच्या शरीराला लागून नेटच्या उजव्या कोपऱ्यात जात होता, पण रेहेनेशने झेप टाकत चेंडू बाहेर घालवला. त्यातून मिळालेल्या कॉर्नरवर एटीकेएमबीला काही करता आले नाही.