इंडीयन सुपर लीगच्या नवीन मोसमाचे वेळापत्रक नुकतेच घोषित झाले आहे. हा इंडियन सुपर लीगचा चौथा मोसम असणार आहे. या मोसमाची सुरुवात १७ नोव्हेंबर २०१७ पासून होईल. या मोसमातील पहिला सामना तिसऱ्या मोसमाचे विजेते ऍथलेटिको डी कोलकाता आणि तिसऱ्या मोसमाचे उपविजेते केरला ब्लास्टर्स या संघात होणार आहे. हा सामना कोलकाताच्या क्रीडा विवेकानंद युवा भारती क्रीडांगण म्हणजे सॉल्ट लेक स्टेडीयम येथे होणार आहे. हा मोसम चार महिने चालणार आहे.
या नवीन मोसमात दोन नवीन संघ लीगशी जोडले जाणार आहेत. बेंगलूरु एफ. सी. आणि जमशेदपूर एफ.सी. हे नवीन दोन संघ या मोसमात इंडियन सुपर लीगमध्ये जोडले जाणार आहेत. या अगोदर इंडियन सुपर लीगमध्ये ८ संघ खेळायचे. या मोसमापासून १० संघ खेळणार आहेत.
या मोसमात एकूण ९५ सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला होम आणि अवे असे सामने खेळावे लागणार आहेत तर सेमीफायनलचे सामने देखील डबल लेगमध्ये होणार आहेत. सेमी फायनलचे सामने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहेत. तर फायनलच्या सामन्याबद्दलच्या ठिकाणाची घोषणा नंतर केली जाणार आहे.
या मोसमातील सर्व सामने हे बुधवार ते रविवार होणार आहेत. प्रत्येक सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. त्यात रविवारी एकाच मैदानावर दोन सामने होणार आहेत. रविवारी पहिला सामना दुपारी ५:३० वाजता सुरु होईल तर दुसरा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल.
एफसी पुणे सिटी विरुद्ध मुंबई सिटी एफसी या दोन संघातील सामना म्हणजे या मोसमातील पहिला महाराष्ट्रीयन डर्बीचा सामना २९ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे.
या मोसमात १० संघानी तब्बल १३२. ७५ कोटी रुपये देऊन ७७ विदेशी खेळाडू तर १६६ भारतीय खेळाडूंना करारबद्ध केले आहे. या मोसमात विदेशी खेळाडूंना सामन्यात खेळवण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. या अगोदरच्या मोसमात ६ विदेशी खेळाडू तुम्ही एका वेळी एका सामन्यात खेळवू शकत होतात या मोसमात फक्त ५ विदेशी खेळाडूंना तुम्ही खेळवू शकता. जास्तीत जास्त भारतीय खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळालवी हा त्याचा उद्देश आहे.