भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केली नाही. विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबियाविरुद्ध भारतीय संघाने चांगली कामगिरी करत स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला होता. आता भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या पराभवानंतर भारतीय संघाबाबत क्रिकेट वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी भारतीय खेळाडू सबा करीम यांनी एक मोठे विधान केले आहे.
माजी भारतीय खेळाडू सबा करीम यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे की टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ इतर मोठ्या संघांपेक्षा खूप मागे आहे. आधुनिक काळातील खेळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघाने स्वतःला विकसित केले पाहिजे आणि आवश्यक ते समायोजन केले पाहिजे असे त्यांचे मत आहे.
सबा करीम म्हणाले की, “सध्या टी२० क्रिकेटचा विकास आणि बदल कसा होत आहे, हे पाहता भारतीय संघ खूप मागे आहे. भारतीय संघाने शक्य तितक्या लवकर स्वतःला तयार केले पाहिजे. टी२० खेळण्यासाठी स्वतःची रणनीती असणे आवश्यक असते. ध्येय निश्चित करताना आणि त्याचा पाठलाग करताना संघाच्या योजना तयार असल्या पाहिजेत. भूमिकांनुसार वेगवेगळे खेळाडू निवडले पाहिजेत.” २०२१ चा टी२० विश्वचषक हा भारतीय संघाच्या थिंक टँकसाठी एक मोठी शिकवण आहे. यातून आगामी जागतिक स्पर्धांच्या तयारीसाठी चांगला धडा मिळेल, असेही त्यांनी म्हटले.
याशिवाय या माजी भारतीय खेळाडूने असेही म्हटले की, न्यू”संघाला कमी लेखले जाते आणि त्यामुळे इतर संघ त्यावर अभ्यास करत नाहीत. न्यूझीलंड संघात मोठी नावे नसल्यामुळे सहज पराभूत होईल असा एक समज इतर संघांचा असतो. न्यूझीलंड संघाला यश मिळण्याचे हे एक मोठे कारण आहे. या संघात अनेक दर्जेदार खेळाडू आहेत. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी चांगली असल्याने, त्याचा त्यांना थोडा फायदा होऊ शकतो.” टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. यानंतर भारताला न्यूझीलंड संघाविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले. आता टी२० विश्वचषकात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे.