जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला. या ऐतिहासिक सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचे लक्ष आता पुढील इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेवर असणार आहे. ही मालिका ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे. याआधी भारतीय संघ हा ब्रिटेनमध्ये २० दिवसांच्या सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे.
या सुट्ट्यांदरम्यान अनेक खेळाडू विम्बल्डन चषक बघण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. तर काही खेळाडू युरो चषक २०२१ चे तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘भारतीय संघ गुरुवारी (२४ जून) साउथॅम्प्टनहून लंडनसाठी निघाला आहे. तेथून २० दिवसांच्या विश्रांतीसाठी खेळाडू युकेमध्ये आपापल्या आवडत्या ठिकाणी रवाना होतील. लंडन आणि आजूबाजूच्या ठिकाणांशी त्यांची ओळख असल्याने बर्याच खेळाडूंची यूकेच्या राजधानीतच राहण्याची अपेक्षा आहे.’
खेळाडू टेनिस आणि फुटबॉल सामने पाहण्यासाठी देखील जाऊ शकतात, असे सूत्राने सांगितले आहे. त्यांनी सांगितले की की, ‘भारतीय संघातील काही खेळाडू टेनिस चाहते आहेत. विम्बल्डन प्रेक्षकांना परवानगी देत असेल तर काही खेळाडू टेनिस सामने पाहण्यासाठी जावू शकतात. त्याचबरोबर काही खेळाडू वेम्बली येथे होणाऱ्या युरो चषक सामन्यांसाठी तिकिटांच्या उपलब्धतेकडेही लक्ष ठेवून आहेत. सर्व खेळाडू १४ जुलै रोजी लंडनमध्ये परत जमून नॉटिंघमला रवाना होतील, जेथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल.’
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने २४९ धावा केल्या आणि ३२ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघाला केवळ १७० धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडने २ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदवर आपले नाव कोरले.
न्यूझीलंड संघाकडून पहिल्या डावात डेवोन कॉनवे आणि दुसऱ्या डावात न्यूझीलंड कर्णधार केन विलियम्सनने अर्धशतक झळकवले. काईल जेमिसनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने या सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या व भारतीय फलंदाजीचा धुव्वा उडवला.
महत्वाच्या बातम्या
भारताच्या हारकिरीनंतर चाहत्यांचा शास्त्रींवर निशाणा, द्रविडला प्रशिक्षक बनवण्याच्या मागणीने धरला जोर
नवी सुरुवात! आगामी कसोटी चँपियनशीपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, भिडणार ‘या’ संघांशी