पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये नुकतीच टी२० मालिका खेळली गेली. ही मालिका अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिली. यामध्ये पाकिस्तानचा ३-० विजय आणि त्यांचा गोलंदाज उस्मान तारिकची संशयास्पद गोलंदाजी यांचा समावेश आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन ग्रीनने तारिकच्या गोलंदाजीवर प्रश्न निर्माण केले होते. त्याच गोलंदाजाच्या मदतीसाठी आता भारतीय पंच धावून आले आहेत.
भारताचे पंच अनिल चौधरी यांनी तारिकच्या गोलंदाजीत कोणतीच अवैध ऍक्शन नाही असे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले, “त्याची गोलंदाजीची स्टाईल थोडी साइड आर्मवाली असून तो चेंडू टाकण्याआधी थोडा थांबतो. तसेच तो सर्वच चेंडू याच पद्धतीने टाकतो, तेव्हा त्याचा खांदा अधिक वळत नाही. यामुळे त्याच्या गोलंदाजीत काहीच गडबड नसून तो जरा वेगळ्याच प्रकारे गोलंदाजी करतो एवढेच.”
लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ग्रीनला तारिकने बाद केले होते. दुसऱ्या टी२०च्या त्या सामन्यात तारिकने सामन्याचे ११वे षटक टाकले होते. त्यावेळी ग्रीन बाद झाल्यावर पवेलियनकडे परताना सीमारेषेपाशी थांबत दगड टाकण्याची ऍक्शन करत आपला राग व्यक्त केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
तारिकची पाठराखण ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा यानेही केली आहे. त्याने तारिकने कोणतीही संशयास्पद गोलंदाजी केली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनेही (आयसीसी) दोन वेळा तारिकची गोलंदाजी तपासली असून त्यामध्ये त्यांना कोणताही दोष आढळला नाही. यावरून त्याच्या गोलंदाजीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही, असे ख्वाजाने त्याच्या इंस्टाग्रामच्या स्टोरिमध्ये म्हटले आहे.
या सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीज राजा यांनीही समालोचन करताना तारिकचा बचाव केला होता. विशेष म्हणजे तारिकचा पाकिस्तानच्या टी२० विश्वचषक संघात समावेश आहे. त्याच्यासारखी गोलंदाजीची ऍक्शन श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, भारताच्या केदार जाधव यांचीही होती.
तीन सामन्यांची ही टी२० मालिका पाकिस्तानने सलमान आगाच्या नेतृत्वाखाली खेळताना ३-० अशी जिंकली. यामध्ये पाकिस्तानची फलंदाजी उल्लेखनीय ठरली.





