अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत इतिहास रचला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२८ धावांच्या आव्हानाचा सामना करताना सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. परंतु शतक व्हायच्या आत गिल झेलबाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार रहाणेही लवकरच पव्हेलियनला परतला. अशात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने भारताचा गडगडता डाव सांभाळत झुंजार अर्धशतकी खेळी केली. सोबतच एक खास विक्रमही केला.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने आक्रमक अंदाज अंगिकारत १३८ चेंडूत नाबाद ८९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० पेक्षा अधिक धावा करण्याची ही त्याची तिसरी वेळ होती. यासह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
पंतपुर्वी माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमानी यांनी सर्वाधिक २ वेळा ऑस्ट्रेलियात ५० धावांचा आकडा पार केला होता. परंतु आता पंतने किरमानी यांना मागे टाकले आहे. सोबतच एमएस धोनी, पार्थिव पटेल, फारोख इंजिनियर आणि किरण मोरे यांच्यावरची तो वरचढ ठरला आहे. या यष्टीरक्षक फलंदाजांनी प्रत्येकी एकवेळा ऑस्ट्रेलियात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
सर्वात जलद १००० धावा करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक
याबरोबरच ब्रिस्बेन कसोटीतील दुसऱ्या डावात पंतने कसोटी कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या. या डावात फलंदाजी करण्यापुर्वी पंतने १६ कसोटी सामन्यातील २६ डावात ९९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे कसोटीतील १००० धावांचा आकडा गाठण्यासाठी त्याला फक्त १ धावेची गरज होती. फलंदाजीला आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा करत त्याने १००० धावा पूर्ण केल्या होत्या. यासह पंत सर्वात जलद कसोटीतील १००० धावा पूर्ण करणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या नव्या ‘द वॉल’च्या खात्यात अजून एका कसोटी अर्धशतकाची भर, पण…
पुजाराच्या बाबतीत ‘तो’ निर्णय दिल्याने संजय मांजरेकर आणि ग्लेन मॅकेग्रा यांच्यात वाद