इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागले आहे. यापूर्वी भारतीय महिला संघ प्रशिक्षण शिबिरासाठी बेंगलोरमध्ये आला आहे. मात्र भारतीय महिला संघातील काही प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये चालू असलेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्या महिला खेळाडू २२ ऑगस्टपर्यंत बेंगलोरला येण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यासाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. परंतु ३० भारतीय महिला क्रिकेटपटूंना १० ऑगस्टपर्यंत बेंगलोरला पोहोचण्यास सांगितले होते. यानंतर ६ दिवसांच्या विलगीकरणानंतर सर्वांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
दरम्यान, इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धा खेळण्यासाठी गेलेल्या स्मृती मंधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा आणि जेमिमा रोड्रिक्स यांना २२ ऑगस्टपर्यंत बेंगलोरला पोहोचण्यास सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी ६ दिवस सर्व खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर देखील ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर सर्व खेळाडूंना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.
या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान सिडनीमध्ये ३ एकदिवसीय सामने, ३ टी-२० सामने आणि एक दिवस-रात्र कसोटी सामना देखील होणार आहे.
पीटीआयसोबत बोलताना भारतीय क्रिकेट बोर्डाचे एक अधिकारी म्हणाले, “ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर पहिल्या आठवड्यात सर्व खेळाडूंना कठोर विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला पुढच्या ७ दिवसांसाठी सराव करण्याची परवानगी मिळेल.”
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी ऑस्ट्रेलियाचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पुढील वर्षाच्या सुरुवातीला न्युझीलंडमध्ये महिलांची विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. त्याच्या तयारीसाठी इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी पर्थच्या वाका मैदानात गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणारा एकमेव कसोटी सामना, आव्हानात्मक ठरू शकतो. भारतीय महिला संघाने तब्बल ७ वर्षांनंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघातला कसोटीचा तसा कमी अनुभव आहे. परंतु इंग्लंड विरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगले पुनरागमन करत सामन्याला अनिर्णित ठेवले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्वाच्या बातम्या –
–इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय आक्रमणासमोर ठरली निष्प्रभ; माजी क्रिकेटरने सांगितले यामागचे कारण
–दोन भागात विभागला गेला न्यूझीलंड संघ; लॅथमचा संघ करणार बांगलादेश दौरा, तर विलियम्सनचा संघ खेळणार टी२० विश्वचषक
–तब्बल ताशी १६१.१ किमी वेगाने चेंडू टाकणारा ‘हा’ ऑसी खेळाडू सांभाळणार अफगाणिस्तानचे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद