हॅमिल्टन| मंगळवार रोजी (२२ मार्च) भारत विरुद्ध बांगलादेश (INDW vs BANW) यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (Women ODI World Cup) २२ वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ११९ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी भारताने ११० धावांनी हा महत्त्वपूर्ण सामना जिंकला असून उपांत्य फेरीतील आशा जिवंत ठेवल्या आहेत.
भारताचा हा विश्वचषकातील तिसरा विजय होता. यासह त्यांच्या खात्यात ६ गुणांची नोंद झाली असून भारतीय संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या संघाला विश्वचषकातील चौथ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे.
स्नेह राणाच्या स्पेलपुढे बांगलादेशचे लोटांगण
या सामन्यात भारताच्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. स्नेह राणाने १० षटकांमध्ये ३० धावा देत बांगलादेशच्या ४ फलंदाजांना पव्हेलियनला चालते केले. तसेच पूजा वस्त्राकार आणि झूलन गोस्वामी यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद करत बांगलादेशला ४०.३ षटकांमध्येच ११९ धावांवर रोखले.
बांगलादेशकडून सलमा खातून ही ३२ धावांची सर्वोच्च खेळी करू शकली. त्यांच्या ६ फलंदाज तर एकेरी धावेवरच विकेट गमावून बसल्या. परिणामी बांगलादेशचा संघ ४१ षटकांमध्येच सर्वबाद झाला.
A magnificent win for #TeamIndia 🙌
They beat Bangladesh by 110 runs to keep their semi-finals qualification hopes alive. #CWC22 pic.twitter.com/ix3xmjE41q
— ICC (@ICC) March 22, 2022
यस्तिका, शेफालीच्या महत्त्वपूर्ण खेळी
तत्पूर्वी भारताकडून प्रथम फलंदाजी करताना यस्तिका भाटियाने शानदार अर्धशतक केले होते. ८० चेंडूंमध्ये २ चौकारांच्या मदतीने ५० धावा करून ती बाद झाली. तिच्याबरोबर सलामीवीर शेफाली वर्मा हिने ४२ धावांचे योगदान दिले. तसेच सलामीवीर स्म्रीती मंधाना (३० धावा, पूजा वस्त्राकार (नाबाद ३० धावा), स्नेह राणा (२७ धावा) आणि यष्टीरक्षक रिचा घोष (२६ धावा) यांच्या छोटेखानी पण उपयुक्त खेळींमध्ये भारताने फलकावर २२९ धावा लावल्या होत्या.
या डावात बांगलादेशच्या रितू मोनीने भारतीय फलंदाजांची चांगलीच परिक्षा घेतली होती. तिने १० षटके गोलंदाजी करताना केवळ ३७ धावा देत भारताच्या ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नहिदा अख्तर हिनेही २ विकेट्सचे योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाने जिंकली टॉपची लढत, अजेय दक्षिण आफ्रिकेला नमवत लगावला विजयाचा ‘सिक्सर’
Video: मुंबईचा कर्णधार रोहितला का आली सारा तेंडूलकरची आठवण? अर्जुनकडे बहिणीची केली चौकशी
Photo | ‘मिशन आयपीएल’साठी विराट कोहली सज्ज, आरसीबीच्या कँपमध्ये केले आगमन