या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्यासाठी सध्या भारतीय कुस्तीपटूंच्या निवड चाचण्या घेतल्या जात आहेत. या दरम्यान दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं सोमवारी (11 मार्च) पटियालामध्ये गोंधळ घातला. तिला दोन वजन श्रेणींमध्ये प्रवेश करायचा होता. बराच गदारोळ झाल्यानंतर विनेशला दोन सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली. तिनं चाचण्यांमध्ये महिलांच्या 50 किलो आणि 53 किलो वजनी गटात भाग घेतला.
विनेशनं 50 किलो वजनी गटात बाजी मारली. मात्र तिला 53 किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत तिचा 0-10 अशा फरकानं पराभव झाला. असं असली तरी 50 किलो वजनी गटात विजय मिळवल्यानंतर विनेशला आता आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला आहे. तिनं 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत शिवानीचा पराभव केला.
या दोन सामन्यांच्या आधी बराच वेळ गदारोळ झाला होता. विनेशला दोन्ही गटात स्पर्धा करायची होती. तिची इच्छा होती की 53 किलो वजनी गटाच्या चाचण्या ऑलिम्पिकपूर्वी घ्याव्यात, ज्यामुळे तिला या गटातून ऑलिम्पिकचं तिकीट मिळविण्याची संधी मिळावी. मात्र हे काही होऊ शकले नाही.
यानंतर विनेश फोगटनं गोंधळ घातला. ऑलिम्पिकपूर्वी 53 किलो वजनी गटाच्या अंतिम चाचण्या घेतल्या जातील, असं लेखी आश्वासन तिनं अधिकाऱ्यांकडून मागितलं होतं. यामुळे विनेशनं ट्रायल्स दरम्यान महिलांच्या 50 किलो आणि 53 किलो वजनी गटात चाचण्या सुरू होऊ दिल्या नाहीत. या विलंबामुळे बाकीचे पैलवान नाराज दिसले.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या तदर्थ पॅनेलद्वारे निवड चाचण्या आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी, क्रीडा मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आलेला भारतीय कुस्ती महासंघ (WFI) यांचं आयोजन करत होतं. IOA ने स्थापन केलेल्या तदर्थ समितीनं आधीच स्पष्ट केलं आहे की 53 किलो वजनी गटासाठी ही शेवटची चाचणी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सात्विक-चिराग जोडीनं जिंकली फ्रेंच ओपन स्पर्धा, तैवानच्या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज विवाह बंधनात अडकला, झिम्बाब्वेमध्ये फिल्मी स्टाइलनं केलं होतं प्रपोज
मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान