भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेचा एकमेव कसोटीत पराभव केला आहे. सोमवारी (1 जूलै) चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 10 गडी राखून पराभव केला.
या सामन्यात शेफाली वर्मानं बॅटनं तर स्नेह राणानं बॉलनं चमकदार कामगिरी केली. शेफालीच्या (197 चेंडूत 205 धावा) द्विशतकाच्या जोरावर भारतानं पहिला डाव 603/6 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर राणाच्या शानदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 266 धावांत गडगडला. राणानं 77 धावांत 8 गडी बाद केले.
पहिल्या डावात 337 धावांची आघाडी घेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला होता. दुसऱ्या डावात भारताला विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य मिळालं होतं, ज्याचा संघानं सहज पाठलाग केला. दुसऱ्या डावात शेफाली 24 धावांवर आणि शुभा सतीश 13 धावांवर नाबाद राहिली.
चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 373 धावांवर संपला. सोमवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेनं 232 धावांवर दोन गडी गमावून खेळण्यास सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूलवर्थ (322 चेंडूत 122) आणि सुने लुस (203 चेंडूत 109) यांनी शतकं झळकावली. नादिन डी क्लर्कनं 182 चेंडूंचा सामना करत नाबाद 61 धावा केल्या. मारिजन कॅपनं 82 चेंडूत 31 धावांचे योगदान दिलं.
दक्षिण आफ्रिकेचे पाच खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. भारताकडून राणा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी 2 बळी घेतले. तर शेफापी, कर्णधार हमरनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक बळी मिळाला. राणानं सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
याआधी शेफाली वर्मानं ऐतिहासिक द्विशतक झळकावलं. तिनं 194 चेंडूत 200 धावा केल्या. यासह ती महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक द्विशतकं झळकावणारी खेळाडू बनली आहे. शेफालीनं स्मृती मंधाना (149) सोबत पहिल्या विकेटसाठी 292 धावांची विक्रमी भागीदारी केली. महिलांच्या कसोटीतील ही सर्वोच्च सलामीची भागीदारी आहे. 52 व्या षटकात डेल्मी टकरने स्मृती मंधानाला बाद करून ही भागीदारी तोडली. स्मृतीनं 161 चेंडूत 27 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 149 धावा केल्या. शेफालीनं आपल्या खेळीत 23 चौकार आणि 8 षटकार मारले. ती 75 व्या षटकात धावबाद झाली.
भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जनं 55, कर्णधार हरमनप्रीतनं 69 धावांची तर यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषनं 86 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून टकरला 2 तर नादिन डी क्लर्क, टेमी सेखुखुने, नॉनकुलुलेको मलाबा यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पराभूत केलं होतं. भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा व्हाईटवॉश केला होता. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका 5 जुलैपासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! भाजपाची महिला आमदार ऑलिम्पिकमध्ये खेळणार! पदक जिंकण्याची पण आहे संधी
“रोहित शर्मानंतर हा खेळाडू भारतीय संघाचा कर्णधार व्हावा”, वीरेंद्र सेहवागनं थेटच सांगितलं
टी20 वर्ल्डकपच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; भारतीय खेळाडूंचा दबदबा तर अफगाण खेळाडूंनाही स्थान