भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये नुकताच कॉमनवेल्थ गेम्सचा पहिला उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यासह इंग्लंडविरुद्ध एक विशेष कामगिरी पहिल्यांदाच केली.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. आपल्या गटात दुसऱ्या स्थानी राहत भारताने तर, दुसऱ्या गटात अव्वल स्थानी राहत यजमान इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारतीय संघातर्फे उपकर्णधार व सलामीवीर स्मृती मंधाना तसेच जेमिमा रॉड्रिग्जने शानदार खेळ करत भारताला १६४ पर्यंत मजल मारून दिली होती. त्यानंतर गोलंदाजांनी इंग्लंडचे नियमित अंतराने बळी घेत आपण सामन्यात जास्त पिछाडीवर राहणार नाही याची खबरदारी घेतली. अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना स्नेह राणाने टिच्चून गोलंदाजी करत भारताला ४ धावांनी विजय मिळवून दिला. आता स्पर्धेचा अंतिम सामना ७ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील विजेत्याशी भारतीय संघाला भिडायचे आहे.
भारताने या विजयासह इंग्लंड विरुद्ध कोणत्याही स्पर्धेच्या बाद फेरीत प्रथमच विजय मिळवला आहे. यापूर्वी हे दोन्ही संघ दोन वेळा विश्वचषकाच्या बाद फेरीमध्ये आमने-सामने आले होते. २०१७ वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडने भारतीय संघाचा ९ धावानी पराभव करत विश्वचषक आपल्या नावे केलेला. त्यानंतर दोन्ही संघ २०१८ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भिडले. त्यावेळी देखील इंग्लंडने सरशी साधली. तेव्हा भारतीय संघाला आठ गड्यांनी मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी भारतीय संघाने ही संधी जाऊ दिली नाही व यजमान इंग्लंडला कांस्यपदकासाठीच्या लढतीत खेळण्यासाठी भाग पाडले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’
इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब





