भारतने बुधवारी बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे तर इंग्लंडने विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला हरवून अंतिम सामन्यात धडाकेबाज एन्ट्री केली आहे. यजमान इंग्लंड आणि या स्पर्धेतील सरप्राईस पॅकेज मानले जाणाऱ्या भारतीय संघामध्ये अंतिम सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.
महिला क्रिकेट विश्वचषक ही संकल्पना १९७३ मध्ये मांडण्यात आली होती. आतापर्यंतच्या विश्वचषकामधे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांचाच कायम दबदबा राहिला आहे. पाहुयात भारत आणि इंग्लंड संघांचा विश्वचषकातील अंतिम सामन्यातील कामगिरीचा हा आढावा.
इंग्लंडची विश्वचषकातील अंतिम सामन्यातील कामगिरी
इंग्लंड आतापर्यंत ६ वेळ अंतिम २ संघात पोहचला आहे, त्यातील ३ सामने त्यांनी जिंकून विश्वचषक विजेतेपदाचे ते मानकरी ठरले आहेत.
विश्वचषक १९७३ विजेता – इंग्लंड
१९७३ चा पहिल्या वहिल्या महिला विश्वचषक जो की इंग्लंडमध्येच झाला तो इंग्लंडच्याच संघाने जिंकली होता.पहिल्या दोन विश्वचषकामधे उपांत्य आणि अंतिम सामना असे काही नव्हते. जो संघ सर्वात जास्त विजय मिळवेल तो संघ विश्वचषकाचा मानकरी ठरायचा.
विश्वचषक १९७८ उपविजेता – इंग्लंड
१९७८ च्या भारतात झालेल्या दुसऱ्या विश्वचषकात इंग्लंड गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता.
विश्वचषक १९८२ उपविजेता – इंग्लंड
न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९८२ च्या विश्वचषकामध्ये इंग्लंडला ऑस्टेलियाकडून अंतिम सामन्यात ३ विकेट्सने हार पत्करावी लागली होती.
विश्वचषक १९८८ उपविजेता – इंग्लंड
१९८८च्या ऑस्टेलियामधील विश्वचषकात ही ऑस्ट्रलियानेच बाजी मारली होती, अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडच्या संघाला ८ विकेट्सने पराभूत केले होते.
विश्वचषक १९९३ विजेता – इंग्लंड
१९९३ ला इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये इंग्लंडने अंतिम सामन्यात ६७ धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला होता आणि विश्वचषक आपल्या नावे केला.
विश्वचषक २००९ विजेता – इंग्लंड
२००९मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियामधील विश्वचषकात न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत केले होते. असे करून त्यांनी तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
भारताची विश्वचषकातील अंतिम सामन्यातील कामगिरी
भारताला आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. भारत २००५ आणि २०१७ म्हणजेच आताच चालू विश्वचषकात अंतिम सामना गाठू शकला आहे.
विश्वचषक २००५ उपविजेता – भारत
२००५ मध्ये भारताने विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता त्यात भारताला बलाढ्य ऑस्ट्रलिया संघाने ९८ धावांनी पराभूत केले होते. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या विश्वचषकातील भारतीय संघाची कर्णधार मिताली राजच होती, जी की २०१७ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ही भारतीय संघाच नेतृत्व करेल.