१९ वर्षांखालील क्रिकेटमधून युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवण्याची ही महत्त्वाची पायरी युवा खेळाडूंसमोर असते. त्यामुळे १९ वर्षांखालील विश्वचषक महत्त्वाचा ठरतो.
आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी १९ वर्षांखालील विश्वचषकातील कामगिरीच्या जोरावर देशाच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले आहे. यासाठी विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, शुबमन गिल, पृथ्वी शॉ अशी काही उदाहरणे आहेत.
आत्तापर्यंत १९ वर्षांखालील १३ विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आल्या आहेत. पहिला १९ वर्षांखालील विश्वचषक १९८८ ला झाला होता. पण त्यानंतर तब्बल १० वर्षांनी १९९८ ला दुसरा विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली. १९९८ नंतर मात्र प्रत्येक २ वर्षांनी ही स्पर्धा झाली. आत्तापर्यंत ७ संघाना हा विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली आहे. भारतीय संघाने सर्वाधिक ४ वेळा हा विश्वचषक जिंकला आहे.
तसेच आत्तापर्यंत ५ भारतीय क्रिकेटपटूंना १९ वर्षांखालील विश्वचषकातील मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. या ५ खेळाडूंचा आणि त्यांच्या विश्वचषकातील कामगिरीचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवणारे भारतीय खेळाडू –
५. यशस्वी जयस्वाल –
जानेवारी-फेब्रुवारी २०२० ला पार पडलेल्या १३ व्या १९ वर्षांखालील स्पर्धेत भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वालची कामगिरी शानदार राहिली. त्याने या संपूर्ण विश्वचषकात ६ सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांसह १३३.३३ च्या सरासरीने ४०० धावा केल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजी करताना ३ विकेट्सही घेतल्या. तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला.
त्याने बांगलादेश विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यातही १२१ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. मात्र त्याच्याव्यतिरिक्त भारतीय संघाची अंतिम सामन्यात निराशाजनक कामगिरी झाल्याने भारताला पराभव स्विकारावा लागला. मात्र असे असले तरी यशस्वी त्याच्या चमकदार कामगिरीमुळे मालिकावीर पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरला. तो १९ वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवणारा ५ वा भारतीय आहे.
एक पाणीपुरीचा ठेला चालणारा मुलगा ते १९ वर्षांखालील विश्वचषकातील मालिकावीर हा त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
४. शुबमन गिल –
२०१८ ला न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आलेला १९ वर्षांखालील विश्वचषक भारतीय संघाला जिंकून देण्यात शुबमन गिलने महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने या विश्वचषकात केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेटविश्वाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. त्याने या विश्वचषकात ६ सामन्यातील ५ डावात खेळताना १२४ च्या सरासरीने ३७२ धावा केल्या होत्या. त्यात त्याच्या १ शतकाचा आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता.
नमुद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अंतिम सामन्याआधी त्याने फलंदाजी केलेल्या प्रत्येक सामन्यात त्याने ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. केवळ त्याला अंतिम सामन्यात ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. पण तरीही त्याने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनज्योत कारलाबरोबर ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. त्याने अंतिम सामन्यात ३१ धावा केल्या होत्या.
तो या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. तो १९ वर्षांखालील विश्वचषकात तब्बल १२ वर्षांनंतर मालिकावीर पुरस्कार मिळणारा भारतीय ठरला होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारताच्या वरिष्ठ संघातही स्थान मिळाले.
३. चेतेश्वर पुजारा –
सध्याचा भारताच्या कसोटी संघातील नियमित सदस्य असलेला चेतेश्वर पुजाराही २००६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात गाजला होता. त्याला या विश्वचषकात त्याच्या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता. तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
त्याने या संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी करत भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. मात्र भारताला अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी वैयक्तिकरित्या चेतेश्वरसाठी हा विश्वचषक पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरला.
त्याने या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात नाबाद ६६ धावांची खेळी करत चांगली सुरुवात केली. एवढेच नाही तर उपांत्यपूर्व सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ९७ धावांची तर उपांत्य सामन्यात इंग्लंड विरुद्ध नाबाद १२९ धावांची खेळी केली होती. मात्र संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी करणारा चेतेश्वर अंतिम सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
त्याने या संपूर्ण विश्वचषकात सलामीवीर म्हणून खेळताना ६ सामन्यात ११६.३३ सरासरीने १ शतक आणि २ अर्धशतकांसह ३४९ धावा केल्या होत्या.
२. शिखर धवन –
भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवनने २००४ चा १९ वर्षांखालील विश्वचषक त्याच्या शानदार कामगिरीने गाजवला होता. या विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आले होते. भारताला पाकिस्तानने पराभूत केले होेते. पण तरीही शिखरची या विश्वचषकातील कामगिरी अफलातून झाली होती.
त्याने या विश्वचषकात ७ सामन्यात ८४.१६ च्या सरासरीने ५०५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ शतकांचा आणि १अर्धशतकाचा समावेश आहे. तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. याचबरोबर एका १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचाही विश्वविक्रम त्याने केला होता. हा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे.
त्याने २००४ च्या विश्वचषकात श्रीलंका, बांगलादेश आणि स्कॉटलंड विरुद्ध शतकी खेळी केल्या होत्या. विशेष म्हणजे शिखरने नंतर भारताच्या वरिष्ठ संघातही पदार्पण करत आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला आयसीसीच्या स्पर्धांचा खेळाडू असे म्हटले जाते. पण याची चुणूक सर्वांना त्याने २००४ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकातूनच दाखवली होती.
१. युवराज सिंग –
मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग हा १९ वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. २००० साली श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघात युवराजने महत्वाची कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेचा मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या विश्वचषकात भारताचा अंतिम सामना श्रीलंका संघाशी झाला होता. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. युवराजने या विश्वचषकात १०३ च्या स्ट्राईक रेटने ८ सामन्यात २०३ धावा केल्या होत्या, तसेच १२ बळी घेतले होते.
त्याची या विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी न्यूझीलंड विरुद्ध झाली होती. त्या सामन्यात त्याने ६८ धावा करण्याबरोबच ४ विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच त्याने नेपाळ विरुद्धही ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने ५८ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती.
ट्रेंडिंग लेख –
फक्त महाराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११
कोहलीसोडून टीम इंडियाचे कर्णधार होण्यासाठी तयार असलेले ३ खेळाडू
कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ प्रसिध्द गोलंदाज