मुंबई । वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी महिला क्रिकेटपटू मिताली राज तिच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. भारताच्या महिला वनडे संघाची कर्णधार स्टार खेळाडू मिताली हिने निवृत्त होण्यापूर्वी एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे. निवृत्तीपूर्वी विश्वचषक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मिताली एका चॅनलवर मुलाखत देताना म्हणाली की, “पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये विश्वचषक होणार आहे. हा माझा शेवटचा विश्वचषक असेल. विश्वचषक जिंकून मी निवृत्ती स्वीकारणार आहे. आशा आहे की, भारतीय संघ हा विश्वचषक जिंकेल. भारत विश्वचषक जिंकल्यास अनेक महिला खेळाडू प्रोत्साहित होतील. या विजयामुळे भारतीय संघ एक पाऊल पुढे टाकेल. 2017 च्या विश्वचषकानंतर अनेक सकारात्मक बदल घडून आले आहेत.”
मिताली 2000 साली पहिल्यांदा विश्वचषकात खेळली होती. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने 2005 आणि 2017 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, विजेतेपद पटकावण्यात तिला अपयश आले. मितालीने मागील वर्षी टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.
37 वर्षीय मितालीने भारताकडून 10 कसोटी, 209 वन डे आणि 89 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे तिने 663, 6888 आणि 2364 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये 1 तर वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत तिने 7 शतके ठोकली आहेत.