भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्याचे संपूर्ण वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जाहीर केले आहे. या दौर्यावर चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर, पहिली टी-२० मालिका खेळेल, त्यानंतर कसोटी मालिका खेळली जाईल आणि अखेर वनडे मालिका खेळली जाईल.
३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत कसोटी मालिकेचा पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड होऊ शकणाऱ्या ११ भारतीय खेळाडूंवर नजर टाकूया.
१. रोहित शर्मा (Rohit Sharma)
या कसोटी मालिकेत सलामीला रोहित शर्मा खेळताना दिसू शकतो. भारताकडे पृथ्वी शॉ आणि केएल राहुलसारखे सलामी पर्याय आहेत पण रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियामधला अनुभव आणि सध्याचा फॉर्म पाहता, कर्णधार विराट कोहली या मालिकेत रोहित शर्माला सलामीची संधी देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माची कामगिरीही उत्कृष्ट होती.
२. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा सोबत मयंक अग्रवाल सलामीला दिसू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या २०१८-१९ च्या दौऱ्यात मयंक अग्रवालने २ अर्धशतके झळकावून आपली प्रतिभा दाखवून दिली होती. तसेच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सतत धावा करत आहे. त्यामुळे तो सध्या भारताच्या कसोटी संघातील नियमित खेळाडू असून त्यालाही या मालिकेसाठी संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्यालाही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवण्यास आवडेल.
३. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
चेतेश्वर पुजारा हा कसोटी क्रिकेटमधील भारतीय क्रिकेट संघाचा कणा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला अनेक सामने जिंकून देण्यात त्याची महत्वाची भूमिका आहे. २०१८-१९ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत विजय मिळवला. त्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ‘मालिकावीर’ (मॅन ऑफ द टूर्नामेंट) ठरला. हा खेळाडू कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे.
४. विराट कोहली (Virat Kohli)
कोहलीच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा असेल. त्याचबरोबर तो संघासाठी नंबर ४ वर खेळेल आणि मधल्या फळीची जबाबदारी स्वीकारेल. विराटने आत्तापर्यंत अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीचा न्यूझीलंड कसोटी दौरा तितका खास नव्हता. परंतु तो पुन्हा फॉर्ममध्ये येण्यास उत्सुक असेल. तो ऑस्ट्रेलियाचा कसोटी दौरा संस्मरणीय बनवायच्या विचारात नाकी असेल. ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकायची असेल तर विराटने आपला खेळ दाखवणे खूप महत्त्वाचे आहे.
५. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या मध्यफळीतील महत्वाचा खेळाडू आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही सामान्यांपासून फॉर्ममध्ये दिसत नाही. न्यूझीलंड दौरादेखील त्याच्याकडून काही प्रदर्शन झालं नाही. पण तरीही त्याचा अनुभव महत्त्वाचा असल्याने तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात असेल. तसेच आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला गमावलेला फॉर्म पुन्हा मिळण्याची संधी असेल. सध्या तो भारताकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळत आहे.
६. हनुमा विहारी (Hanuma Vihari)
हनुमा विहारी हा भारतीय कसोटी संघातील एक युवा खेळाडू आहे. त्याला एक ‘कसोटी स्पेशलिस्ट’ देखील म्हटले जाते. आतापर्यंत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने शानदार खेळ दाखविला. न्यूझीलंडमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. पण आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्तम कामगिरी करून त्याला भारतीय कसोटी संघात आपले पूर्णपणे पक्के करण्याची इच्छा असेल.
७. रिषभ पंत (Rishabh Pant)
रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारताच्या संघामध्ये समाविष्ट केले जाईल. या संघात वृध्दिमान साहाच्या रूपात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आणखी एक पर्याय आहे, परंतु रिषभ पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांत शतक झळकावले होते, त्यामुळे कर्णधार कोहली त्याला प्रथम संधी देण्याची शक्यता आहे.
८. आर अश्विन (Ravichandran Ashwin)
आर अश्विन हा मुख्य फिरकीपटू म्हणून भारतीय संघाकडून खेळेल. रवींद्र जडेजा न्यूझीलंड दौर्यावर काही खास कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे कर्णधार विराट कोहली अश्विनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी देऊ शकेल. भारतीय संघाकडे रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या रूपातही दोन पर्याय असतील, परंतु प्रथम संधी अनुभवी फिरकीपटू अश्विनला देण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
९. इशांत शर्मा (Ishant Sharma)
इशांत शर्मा हा भारतीय कसोटी संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. गेली दोन वर्षे तो आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ कामगिरी करत आहे. त्यामुळे भारतीय संघातील त्याचे स्थान जवळपास निश्चित आहे. जगातल्या कोणत्याही फलंदाजाला त्याच्या स्विंग चेंडूमध्ये अस्वस्थ करण्याची क्षमता इशांतमध्ये आहे. इशांत शर्माने न्यूझीलंड दौऱ्यातही शानदार कामगिरी केली होती.
१०. मोहम्मद शमी (Mohammed Shami)
मोहम्मद शमीची आतापर्यंतची कसोटी क्रिकेट कारकीर्द खूप प्रभावी आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडमध्येही त्याने शानदार गोलंदाजी केली. भारतीय संघाच्या गोलंदाजीची सुरुवात तो नवीन चेंडूने करु शकतो. त्यामुळे त्याच्या खांद्यावर संघाला प्रारंभिक यश मिळवून देण्याची जबाबदारी असेल. हा खेळाडू गेल्या ३-४ वर्षांपासून भारताच्या कसोटी संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.
११. जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah)
जसप्रीत बुमराहला हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याला सध्या जगातील नंबर एकचा गोलंदाज म्हटले जाते. त्याच्या चेंडूंचा सामना करणे फलंदाजासाठी अवघड जात आहे. त्याने आतापर्यंतच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत चमकदार गोलंदाजी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही ही ती लय कायम ठेवण्यास त्याला आवडेल. ऑस्ट्रेलियाच्या मागील दौर्यावरही त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीने खूप त्रास दिला होता.
वाचनीय लेख –
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे ५ फलंदाज
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिग्गज असलेले ३ खेळाडू, जे नाही खेळू शकले जास्त कसोटी क्रिकेट
५ दिग्गज खेळाडू ज्यांनी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला वर्ल्डकप फायनलमध्ये