मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्या(10 मार्च) चौथा वनडे सामना होणार आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पुढे आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकाही खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे, तर ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी रिषभ पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पंत मागील काही सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. पण विश्वचषक जवळ येत असल्याने आणि विश्वचषकाआधी भारतीय संघाचे हे दोनच सामने राहिले असल्याने पंत समोर विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान पक्के करण्याची ही मोठी संधी आहे.
त्याचबरोबर मोहम्मद शमीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. याबद्दल भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर शमी फिट नसेल तर चौथ्या वनडेत भुवनेश्वर कुमारला संधी दिली जाईल.
त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन शमीच्या फिटनेसबद्दल धोका पत्करण्यापेक्षा भुवनेश्वरला संधी देण्याचा विचार करु शकतात.
तसेच केएल राहुललाही या चौथ्या वनडे सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. शिखर धवन मागील काही सामन्यात चांगल्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे राहुलचा विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.
राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याने पहिल्या टी20 सामन्यात 50 तर दुसऱ्या टी20 सामन्यात 47 धावांची खेळी केली होती. त्यामुळे विश्वचषकाचा विचार करता त्याचाही फॉर्म तपासण्यासाठी त्याला संघ व्यवस्थापन संधी देण्याच्या विचारात असेल.
तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी भारताच्या 11 जणांच्या संघात बदल होऊ शकतात अशी कल्पना दिली आहे. त्याने म्हटले आहे की ‘आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ. त्यांनी त्याचा फायदा घ्यायला हवा. कारण विश्वचषक जवळ येत आहे आणि सर्वांना संघात जागा हवी आहे.’
त्यामुळे पंत, राहुल, भुवनेश्वर यांना जर संधी मिळाली तर त्यांना स्वत:चा फॉर्मही सिद्ध करावा लागणार आहे.
त्याचबरोबर रांची येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 11 जणांच्या संघात खेळलेले अन्य खेळाडू चौथ्या सामन्यासाठीही कायम असू शकतात.
चौथ्या वनडे सामन्यासाठी असा असू शकतो संभाव्य भारतीय संघ-
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, अंबाती रायडू, रिषभ पंत, केदार जाधव, विजय शंकर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
–सगळ्या पाकिस्तानच्या खेळाडूंएवढ्या सेंच्युरी केल्यात एकट्या किंग कोहलीने
–एमएस धोनी पाठोपाठ हा खेळाडूही मोहाली वनडेतून बाहेर
–पाकिस्तान म्हणतंय, आर्मीची टोपी घालून खेळणाऱ्या भारतीय संघावर कारवाई करा