पुणे, 24 जानेवारी 2024: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 50,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती, झील देसाई यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती हिने जपानच्या एरी शिमिझूचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना 1तास 7 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये श्रीवल्लीने शिमिझूची पहिल्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत आघाडी घेतली. या सेटमध्ये शिमिझूला सूर गवसलाच नाही. श्रीवल्लीने शिमिझूची सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील पहिल्या सेटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. श्रीवल्लीने शिमिझूची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
अव्वल मानांकित लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तजाला भारताच्या व सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 25000डॉलर महिला आयटीएफ स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या सहजा यमलापल्ली हिने विजयासाठी चांगलेच झुंजवले. सेमेनिस्तजाने सहजावर 5-7, 6-3, 6-3 असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. ग्रीसच्या सॅपफो साकेल्लारिडी हिने भारताच्या सातव्या मानांकित अंकिता रैनाचा 3-6, 6-3, 6-2 असा पराभव करून पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. लकी लुझर ठरलेल्या भारताच्या झील देसाई हिने भारताच्या ऋतुजा भोसलेचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 6-2 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
फिनलंडच्या एनास्तेसिया कुलिकोवा हिने लकी लुझर ठरलेल्या जपानच्या युकीना सायगोला 6-0, 6-3 असे नमविले. जपानच्या चौथ्या मानांकित हिमेनो साकात्सुमेने सर्बियाच्या डेजाना राडानोविकचे आव्हान 6-3, 3-6, 6-1 असे संपुष्टात आणले. क्वालिफायर स्लोवाकियाच्या व्हिक्टोरिया मोर्वायोवाने जपानच्या साकी इमामुराचा 7-5, 4-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. पाचव्या मानांकित फिलिपिन्सच्या अलेक्झांड्रा एलाने हंगेरीच्या फॅनी स्टोलरचा 6-2, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
दुहेरीत पहिल्या फेरीत ग्रीसच्या सॅपफो साकेल्लारिडी व भारताच्या प्रार्थना ठोंबरे या दुसऱ्या मानांकित जोडीने भारताच्या ईश्वरी मातेरे व मधुरिमा सावंत यांचा 6-1, 6-4 असा तर, भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व वैदेही चौधरी यांनी स्लोवाकियाच्या व्हिक्टोरिया मोर्वायोवा व ऑस्ट्रियाच्या टीना नादिन स्मिथ यांचा 6-3, 5-7, 10-8 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी गट: पहिली फेरी:
दरजा सेमेनिस्तजा(लात्विया) [1]वि.वि.सहजा यमलापल्ली (भारत)5-7, 6-3, 6-3;
सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस)वि.वि.अंकिता रैना (भारत) [7]3-6, 6-3, 6-2;
श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती (भारत)वि.वि.एरी शिमिझू (जपान) 6-3, 6-2;
हिमेनो साकात्सुमे (जपान) [4]वि.वि.डेजाना राडानोविक (सर्बिया) 6-3, 3-6, 6-1;
व्हिक्टोरिया मोर्वायोवा (स्लोवाकिया) वि.वि.साकी इमामुरा (जपान)7-5, 4-6, 6-1;
अलेक्झांड्रा एला (फिलिपिन्स) [5]वि.वि.फॅनी स्टोलर (हंगेरी) 6-2, 6-2;
एनास्तेसिया कुलिकोवा (फिनलंड) वि.वि.युकीना सायगो(जपान)6-0, 6-3;
नाहो सातो (जपान) वि.वि.रिना सायगो(जपान)6-1, 6-0;
झील देसाई (भारत) वि.वि.ऋतुजा भोसले (भारत)7-6(6), 6-2;
दलिला जाकुपोविक (स्लोवाकिया) वि.वि.नैकिता बेन्स (ग्रेट ब्रिटन)6-3, 7-6(6);
दुहेरी: पहिली फेरी:
सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस) [2] /प्रार्थना ठोंबरे (भारत)वि.वि. ईश्वरी मातेरे(भारत)/मधुरिमा सावंत(भारत) 6-1, 6-4;
श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती (भारत) /वैदेही चौधरी (भारत) वि.वि.व्हिक्टोरिया मोर्वायोवा (स्लोवाकिया) /टीना नादिन स्मिथ (ऑस्ट्रिया)6-3, 5-7, 10-8
महत्वाच्या बातम्या –
स्वर्गीय ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्वयुश स्ट्रायकर्स, क्लासिक पँथर्स संघांची विजयी सलामी
Shoaib Bashir । इंग्लिश फिरकीपटूच्या प्रकरणात रोहितचे रोखठोक विधान; म्हणाला, ‘मी विजा ऑफिसमध्ये…’