भारतीय संघाला अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 असा पराभव पत्कारावा लागला. यासह ‘मेन इन ब्लू’नं तब्बल 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेत उभय संघांमध्ये प्रथमच पाच कसोटी सामने खेळले जातील.
बीसीसीआयनं या दौऱ्यासाठी भारताचा 18 सदस्यीय संघ आधीच जाहीर केला आहे. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणाऱ्या सामन्यानं होईल. भारतीय संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवसारखे महत्त्वाचे खेळाडू संघात नाहीत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताची सर्वात मजबूत प्लेइंग 11 काय असेल हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
सलामीवीर – रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल
या मालिकेत रोहित शर्माचा बॅकअप म्हणून अभिमन्यू ईश्वरनची निवड करण्यात आली आहे. त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी उत्कृष्ट आहे. रोहितच्या अनुपस्थितीत त्याला पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. या मालिकेत रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी ओपनिंग करताना दिसेल यात शंका नाही. या जोडीला सुरुवातीलाच मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स या अनुभवी गोलंदाजांचा सामना करावा लागेल.
मधली फळी – शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा
शुबमन गिल भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. ऑस्ट्रेलियात या क्रमांकावर फलंदाजी करणं त्याच्यासाठी आव्हानात्मक असेल. विराट कोहली भलेही त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत आहे, मात्र बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याची बॅट शांत राहणार नाही, अशी चाहत्यांची आशा आहे.
रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. मात्र केएल राहुलचा खराब फॉर्म पाहता त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. ऑस्ट्रेलियात त्याच्या बॅटमधून धावा आल्या आहेत.
खालची फळी – वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करू शकतो. तर वॉशिंग्टन सुंदरला दुसरा फिरकीपटू म्हणून खेळण्याची संधी मिळू शकते. तो 8व्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकतो. जसप्रीत बुमराह मुख्य वेगवान गोलंदाज असेल. त्याला आकाशदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांची साथ मिळेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताची सर्वात मजबूत प्लेइंग 11 – रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह
हेही वाचा –
मोहम्मद रिझवानचं नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच पाकिस्तानी
पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हाणलं, वनडे सामन्यात एकतर्फी विजय!
केएल राहुलचं हसं, खूपच विचित्र पद्धतीनं बाद; चाहत्यांना केली थेट बाबर आझमशी तुलना; VIDEO पाहा