भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका सध्या सुरू असलेल्या आयसीसी कसोटी जागतिक अजिंक्यपद २०२५ – २७ चा भाग असणार आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत पाचव्या तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ते १९ ऑगस्टमध्ये गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आणि दुसरा सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. २०१७ नंतर प्रथमच भारत श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे.
जेव्हा भारताने २०१७ मध्ये श्रीलंका दौरा केला होता, तेव्हा खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता. त्यानंतर दोनदा श्रीलंका संघ कसोटी मालिका खेळण्यास भारत दौऱ्यावर आला होता.
आता ऑगस्टमध्ये जो दौरा होणार आहे, त्यामध्ये दोन्ही क्रिकेट बोर्डांनी तीन टी२० सामन्यांच्या समाविष्टाबाबत चर्चा केली होती, मात्र श्रीलंका क्रिकेटच्या प्रसिद्धीपत्रकात त्याचा उल्लेख नाही.
(बातमी अपडेट होत आहे..)





