---Advertisement---

AUS vs IND 1st Test : पहिल्या दिवसअखेर भारताच्या ६ बाद २३३ धावा, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची सुरेख कामगिरी

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 5:25 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान भारताने पहिल्या दिवसाअखेर ६ विकेट्स गमावत २३३ धावा केल्या.

असा राहिला पहिल्या दिवसाअखेर भारताचा डाव

ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज गोलंदाजांचा सामना करताना भारतीय संघाच्या सुरुवातीला पटापट विकेट्स पडल्या. एकवेळ भारतीय संघाने ३२ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळी करत ६८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर पुजारा डावाच्या १०० धावांत तंबूत परतला. यानंतर फलंदाजीला अजिंक्य रहाणे आला. त्याने विराटसोबत ८८ धावांची भागीदारी रचली आणि १८८ धावांपर्यंत संघाला मजल मारण्यात योगदान दिले. यादरम्यान विराट कोहली ७४ धावांवर धावबाद झाला.

विराट पाठोपाठ रहाणेही ४२ धावा करत तंबूत परतला. पहिल्या कसोटीपूर्वी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात शतक ठोकणारा हनुमा विहारी या डावात सपशेल फ्लॉप ठरला. त्याला केवळ १६ धावा करता आल्या. सध्या भारतीय संघ पहिल्या दिवसाअखेर ६ विकेट्स गमावत २३३ धावांवर आहे. संघाकडून वृद्धिमान साहा (९) आणि आर अश्विन (१५) धावांवर नाबाद आहेत.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची सुरेख कामगिरी

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याने १९ षटके गोलंदाजी करताना ४९ धावा दिल्या. त्याच्याव्यतिरिक्त जॉश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने प्रत्येकी १ विकेट आपल्या खिशात घातली.

विराट झाला धावबाद

झाले असे की, ऑस्ट्रेलियाकडून ७७ वे षटक टाकण्यासाठी नॅथन लायन आला होता. याच षटकातील सहावा चेंडू लायनने भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेला टाकला. या चेंडूवर रहाणेने फटका मारला. यावर त्याने विराटला धाव घेण्यासाठी इशारा दिला. रहाणे थोडासा पुढे धावला आणि त्यानंतर पुन्हा मागे वळला. त्यामुळे इथेच गडबड झाली आणि अर्ध्या खेळपट्टीपर्यंत आलेला विराट कोहली धावबाद झाला. यादरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

रहाणेही झाला बाद

यादरम्यान ८१ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मिचेल स्टार्कने चौथ्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेलाही तंबूत धाडलं. रहाणेने या डावात ९२ चेंडूत ४२ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश आहे.

विराटने केले अर्धशतक पूर्ण

डावातील ६० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराटने एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. विराटने १२३ चेंडू खेळत आपले अर्धशतक ठोकले. यामध्ये ५ चौकारांचा समावेश आहे. यासह विराटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २२ वे अर्धशतक पूर्ण केले. ६१ षटकांनंतर भारतीय संघाची धावसंंख्या ३ विकेट्स गमावत १२८ आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार

विराटने अर्धशतक ठोकत आणखी एक कारनामा केला आहे. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. तो ८३०* धावांवर खेळत आहे. त्याच्यापूर्वी मन्सूर अली खान पतौडी यांनी ८२९ धावा, एमएस धोनी ८१३, सुनील गावसकर ५४३ आणि मोहम्मद अझरूद्दीन यांनी ५०३ धावा केल्या होत्या.

विराट- पुजाराच्या भागीदारीने झाल्या संघाच्या शंभर धावा पूर्ण

भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर पव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने बचावात्मक खेळ केला. त्यांनी संघाचा डाव २ विकेट्स गमावत ३२ वर असताना संथ खेळी करत धावफलक हलता ठेवला. आणि ६८ धावांची भागीदारी करत ४९.३ षटकात संघाच्या शंभर धावा पूर्ण केल्या.

यावेळी पुजाराने (२९) आणि विराटने (३४) धावांचे योगदान दिले.

पुजारा झाला झेलबाद

डावाच्या ४९.३ षटकात संघाच्या शंभर धावा पूर्ण केल्यानंतर पुजारा पुढच्याच चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन टाकत असलेल्या चौथ्या चेंडूवर पुजाराने पुढे येत फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू उडला आणि क्षेत्ररक्षक मार्नस लॅब्यूशानेन झेल घेतला. त्यामुळे पुजाराला झेलबाद व्हावे लागले. यादरम्यान पुजाराने १६० चेंडूंचा सामना करताना ४३ धावा केल्या. यामध्ये २ चौकारांचा समावेश होता. ५२.२ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ विकेट्स गमावत १०३ आहे.

कमिन्सने अगरवालला तंबूत धाडले

पृथ्वी शॉ आऊट झाल्यानंतर पुजारा आणि मयंक अगरवाल यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र १९ वे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सने पहिल्याच चेंडूवर मयंक अगरवालला बाद केले.

पृथ्वी शॉ दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत

या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी सलामीला पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल आले होते. यादरम्यान पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर फलंदाजी करत असलेला शॉ ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भेदक चेंडूवर त्रिफळाचीत झाला. शॉ बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी चेतेश्वर पुजारा आला. पुजारा आणि अगरवाल संयमी खेळी करत डाव पुढे नेत आहेत.

डावातील १२ व्या षटकानंतर भारताची धावसंख्या १ विकेट गमावत २५ होती.

प्लेईंग इलेव्हनची घोषणा-

या सामन्याच्या एक दिवसापूर्वीच भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताकडून पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजी करतील, तर वृद्धिमान साहाला यष्टीरक्षक म्हणून ताफ्यात सामील केले आहे.

विराटसाठी हा सामना खूपच खास असेल. कारण या सामन्यानंतर तो आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी भारतात परतणार आहे. त्यानंतर त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे उर्वरित ३ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्त्व करणार आहे.

विशेष म्हणजे या प्लेईंग इलेव्हनमध्ये शुबमन गिल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंना संधी दिलेली नाही.

विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने एकदाही कसोटी सामना गमावलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या २५ सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली. त्यात भारताने २१ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ४ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलिया संघाची प्लेईंग इलेव्हन
टिम पेन (कर्णधार), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्यूशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरॉन ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेडलवूड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---