भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथे तर शेवटचे २ सामने अहमदाबाद येथे येथे होणार आहे. भारतीय संघ बऱ्याच काळानंतर मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटानंतर भारतात होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे.
ही मालिका रंगतदार होईल, असे अनेकांनी मत मांडले आहे. कारण भारतीय संघ काहीदिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून परतला आहे, तर इंग्लंड संघाने श्रीलंकेला श्रीलंकेत कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघ आत्मविश्वासाने पूर्ण भरलेले आहेत.
आता शुक्रवारपासून अखेर या बहुप्रतिक्षित मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीेनेही महत्त्वपूर्ण आहे.
भारताचे चेन्नईच्या मैदानातील एकूण सामने –
भारताने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण ३२ सामने खेळले आहेत. त्यातील १४ सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. तर ६ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागाला आहे. याशिवाय ११ सामना अनिर्णित राहिले आहेत. चेन्नई येथे मागील १३ वर्षात ३ कसोटी सामने भारताने खेळले आहेत. त्यातील २ इंग्लंडविरुद्ध तर १ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
इंग्लंडविरुद्धचे चेन्नईच्या मैदानातील सामने –
भारताने चेन्नईमध्ये खेळलेल्या एकूण ३२ सामन्यांपैकी ९ सामने इंग्लंड संघाविरुद्ध खेळले आहेत. त्यातील ५ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात इंग्लंड संघ विजयी झाला आहे. तसेच १ सामना अनिर्णित राहिला आहे. इंग्लंडने भारताविरुद्ध मिळवलेले तिन्ही विजय हे १९९० सालाच्या आधीचे आहेत. त्यानंतर इंग्लंडला चेन्नईमध्ये विजय मिळवता आलेला नाही.
दोन्ही संघात स्टार खेळाडूंचे पुनरागमन
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंत, शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांना अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळेल, असा इशारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात विराटसह हार्दिक पंड्या आणि इशांत शर्माचेही पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. त्यामुळे आता ११ जणांच्या संघात कोणा-कोणाला संधी दिली जाणार हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
याबरोबरच इंग्लंड संघातही जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, रॉरी बर्न्स यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तर पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडला जॅक क्राऊले दुखापतीमुळे बाहेर पडल्याने मोठा धक्का बसला आहे. याशिवाय इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी सॅम करन आणि जॉनी बेअरस्टो यांना विश्रांती दिली आहे.
कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना घ्या जाणून –
१.भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरु होईल. त्याआधी सकाळी ९.०० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदिप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.
इंग्लंडचा संघ –
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्राउले, बेन स्टोक्स, टेन लॉरेंस, जॅक लीच, डॉम सिब्ले, बेन फोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या मैदानावरील ‘हे’ १० विक्रम तुम्हाला माहित असायला हवेत
जो रूटने घेतली ‘या’ भारतीय फलंदाजाची धास्ती, म्हणाला…
राजस्थान रॉयल्सच्या आणखी एका क्रिकेटपटूची विकेट पडली; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली माहिती