---Advertisement---

बिकट परिस्थितीत राहुलचे विश्वविक्रमी शतक, राजकोट वनडेत रोहित-विराट फेल

On: बुधवार, जानेवारी 14, 2026 5:36 PM
---Advertisement---

राजकोट येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडे (14 जानेवारी) सामन्यात केएल राहुल याने आकर्षक अशी शतकी खेळी केली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. संघाची स्थिती गंभीर असताना राहलने चिकाटीने खेळत संघाचा धावफलक हलता ठेवला. यासाठी त्याला रविंद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी योग्य साथ दिली.

राहुलने जडेजा आणि रेड्डी दोघांसोबत अर्धशतकी भागीदारी करत आपले वनडेतील आठवे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर तो राजकोटमध्ये वनडे शतक ठोकणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने कायले जॅमिसनला षटकार खेचत 87 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. या सामन्यात त्याने 92 चेंंडूत 11 चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने नाबाद 112 धावा केल्या.

या सामन्यामध्ये भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र त्यांनी निराशा केली. कर्णधार गिलने अर्धशतकी खेळी करत पहिल्या विकेटसाठी रोहितबरोबर 70 धावा जोडल्या. त्यानंतर मात्र संघाची अवस्था 4 बाद 118 धावा अशी झाली. अशा स्थितीत सुरूवातीला राहुलने जडेजाच्या सहाय्याने संयमी खेळ केला आणि जेथे संधी मिळाली तेथे चेंडू टोलवत धावा वसूल केल्या. जडेजा 27 धावा करत बाद झाला. रेड्डीही 20 धावा करत परतला.

राहुलच्या शतकी खेळीमुळे भारताने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 284 धावसंख्या उभारली. न्यूझीलंड फलंदाजी करत असून त्यांची धावसंख्या 4 षटकात 20 धावा असून त्यांनी एकही विकेट गमावलेली नाही. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत पहिला सामना जिंकत 1-0 असा आघाडीवर आहे. तसेच तिसरा सामना 18 जानेवारीला इंदौर येथे खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---