पुणे । आयकर विभागाच्या अभिषेक कुलकर्णी व नागेश पालकर यांनी विश्वराज यादव व अक्षय जोगदेव यांच्या जोडीला पराभूत करताना आंतरकार्यालय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या एकेरीत अभिषेक कुलकर्णी यांनी तर वरिष्ठ गटाच्या एकेरीत नीलेश गोरे यांनी विजेतेपदाला गवसणी घातली.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉल येथे आंतर कार्यालय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे शहर आंतर कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश विपट, सचिव सुभाष बोधे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी तानाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष गटाच्या दुहेरीत अभिषेक कुलकर्णी व नागेश पालकर यांच्या जोडीने विश्वराज यादव व अक्षय जोगदेव यांच्या जोडीला १०-१५, १५-३, १५-१३ असे पराभूत करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये अभिषेक कुलकर्णी व नागेश पालकर यांच्या जोडीने हेमंत सहस्त्रबुद्धे व श्रीपाद सरदेशपांडे यांच्या जोडीला १५-१०, १५-९ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
पुरुष गटाच्या एकेरी स्पर्धेत अभिषेक कुलकर्णीने अक्षय जोगदेवला १५-५, १५-५ असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये अभिषेक कुलकर्णी याने सुशांत पाटील यांना १५-१०, १३-१५, १५-६ असे पराभूत करताना अंतिम फेरीत धडक मारली होती.
वरिष्ठ गटाच्या एकेरी अतीतटीच्या लढतीमध्ये निलेश गोरे यांनी पुरुषोत्तम पाटील यांना १५-८, १३-१५, १५-७ असे पराभूत करताना विजेतेपद पटकावले. त्यांनी उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये संतोष ढोरेला १५-१०, १२-१५, ११-१५ असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये प्रवेश केला होता.
महिलांच्या गटात मृणाल भालेरावने केतकी पाठकला १५-६, १५-३ असे पराभूत करताना विजेतेपदाला गवसणी घातली.