पुणे ।आंतरराष्ट्रीय वुशू फेडरेशनच्या वतीने आयोजित ७ व्या जागतिक कुंग फू स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करीत १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई केली आहे. पुण्याच्या श्रावणी कटके हीने ज्युनियर गटात जैनशू मध्ये रौप्यपदक पटकाविले आहे. यासोबतच तृप्ती चांदवडकर (ननक्वॅन), खुशी तेलकर (गुन्शू), सीआरपीएफच्या खेळाडू करमजीत कौर (ननक्वॅन), अथर्व मोडक (ताईचीक्वॅन, २ कांस्य) यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
भारतीय संघात विविध राज्यातील ११ खेळाडूंचा सहभाग होता, यामध्ये ७ खेळाडू महाराष्ट्रातून सहभागी झाले होते. स्पर्धेत जगभरातील ५७ देश सहभागी झाले होते. मंगळवार दिनांक ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान चीन येथील इमेशॉन, सिशुआन येथे ही स्पर्धा झाली.
भारतीय वुशू महासंघाचे प्रेसिडेंट भूपेंदर सिंग बाजवा, सचिव सुहेल अहमद यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. पुण्यातील एस.के. स्पोर्टस् फाऊंडेशनचे सर्व खेळाडू असून महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव आणि प्रशिक्षक सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ज्युनियर गटात श्रावणी कटके (सिंहगड कॉलेज आॅफ सायन्स आर्टस् अॅण्ड कॉमर्स), खुशी तेलकर (सेंट मीराज्), अथर्व मोडक (स.प. महाविद्यालय), तृप्ती चांदवडकर (अभिनव कॉलेज), सिद्धी शिंदे ( सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल) सहभागी झाले होते.