गतवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. विराट आणि कंपनीने या दौऱ्यातील अखेरच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या ऐतिहासिक विजयाचा एका अर्थाने नायक ठरलेल्या यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला या दौऱ्यातूनच नवी ओळख मिळाली. आजही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या अद्भुत प्रदर्शनाची प्रशंसा होते.
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यानेही पंतच्या कामगिरीची तोंडभरुन स्तुती केली आहे. आज जगभारतील बलाढ्य संघही पंतला घाबरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
भारतीय संघाचा उभरता यष्टीरक्षक पंतमध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे. याचमुळे तो आज इतका यशस्वी खेळाडू बनला आहे. याबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला की, “आत्मविश्वासाच्या बळावर कोणीही काहीही करू शकते आणि पंत याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि भारतीय अ संघाकडूनही तो चमकला आहे. तो जेव्हाही देशाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरतो तेव्हा तो त्या आत्मविश्वासासह खेळताना आपल्याला दिसतो.”
“आता तो इतका मोठा झाला आहे आणि फलंदाजीच्या एका वेगळ्या मार्गावर उभा आहे. आता मोठमोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघही त्याच्याविषयी बोलत असतात. त्याच्यात एक सत्र किंवा एक डाव बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे भलेभले खेळाडूही त्याला घाबरत आहेत. ही भारतीय संघाची चांगली बाब आहे,” असे कार्तिकने पुढे म्हटले आहे.
पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहासुद्धा एक चांगला यष्टीरक्षक आहे. तो माझ्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षांपैकी एक आहे. परंतु पंत त्याच्या फलंदाजीत खूप पुढे निघून गेला आहे आणि संघासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. याच कारणाने साहाला बाकावर बसण्यास भाग पाडले आहे.”